टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाने सध्या सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिलिंद देवरा हे आजच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठी धुसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाकडून अनेक वेळा दक्षिण मुंबई मतदारसंघात दावा करण्यात आला आहे.
त्यामुळेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा नाराज असल्याचं दिसून आलं आणि त्यांनी याच नाराजीतून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असं म्हटलं जात आहे. मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील होत आहे.
कोण आहेत मिलिंद देवरा
मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील मुरली देवरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते तर आई हेमा देवरा गृहिणी होत्या. मिलिंद देवरा हे वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षात सक्रिय होते. दक्षिण मुंबई या व्हीआयपी सह श्रमिक वर्गाचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले. ते टेक्नोसॅव्ही आणि धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जातात.
मिलिंद देवरा उच्चशिक्षित राजकीय नेते आहेत. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत. 9 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांनी चित्रपट निर्माता मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी हिच्याशी लग्न केले. त्यांची पत्नी वॉक वॉटर मीडिया या चित्रपट निर्माता कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे.
पहिल्यांदा 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 5 ऑगस्ट 2004 रोजी त्यांना संरक्षण मंत्रालय समितीचे सदस्य करण्यात आले. 7 ऑगस्ट 2006 रोजी ते केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य झाले.
2009 मध्ये ते पुन्हा लोकसभेत पोहचले. त्यांनी अनेक पदांची जबाबदारी संभाळली आहे. ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखान्याचे सदस्य आहेत.
नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन झाली. त्यात अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे यांनी त्यांना संयुक्त कोषाध्यक्ष ही जबाबदारी सोपवली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज