टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतातील बांधावरून दोघा भावांमध्ये वाद होता. त्यातूनच मोठ्या भावाने लहान भावावर सशस्त्र हल्ला करून त्यास जखमी केल्याबद्दल त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना पंढरपूरच्या न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती.
२३ वर्षे चाललेला हा वाद तडजोडीने आपापसात मिटविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जखमी भावाचा मृत्यू झाला.
शेवटी दोन्ही भावांच्या कुटुंबीयांमधील हे तडजोडीचे प्रकरण न्यायालयात गेले आणि मोठ्या भावाच्या कुटुंबीयांस झालेली शिक्षा रद्द झाली.
अशा प्रकारे मृत व्यक्तीच्यावतीने त्याच्या कुटुंबीयांनी फौजदारी खटला अपिलात तडजोड करायची ही पहिलीच घटना मानली जाते.
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे राहणाऱ्या नवनाथ बापू पवार व त्यांचे बंधू विनायक बापू पवार यांच्यात १९९८ पासून शेतातील बांधावरून वाद होता. त्यातूनच पुढे २८ ऑक्टोबर २००८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवनाथ पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी विनायक पवार यांच्यावर सशस्त्र हल्ला करून त्यांना जखमी केले होते.
याप्रकरणी जखमी विनायक यांच्या पत्नी मालन पवार यांनी पंढरपूर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरूध्द न्यायालयात खटला दाखल झाला होता.
या खटल्यात नवनाथ पवार यांच्यासह त्यांची पत्नी सिंधू व मुले तानाजी आणि नितीन यांना पंढरपूर न्यायालयाने एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरूध्द अपील दाखल करण्यात आले होते.
प्रदीर्घकाळ भावकीत सुरू असलेल्या संघषांतून मोठ्या भावाला शिक्षा झाली, याचे लहान भावाला खूप वाईट वाटत होते. त्यामुळेच त्याने याप्रकरणात तडजोड करण्याचे ठरविले होते.
दुर्दैवाने पुढे १ जुलै २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत विनायक यांची या प्रकरणात तडजोड करण्याची इच्छाशक्ती अपूर्णच राहिली त्यांची इच्छापूर्ती करण्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी ठरविले. त्यानुसार प्रकरण तडजोड करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
परंतु, जखमी विनायक पवार हे मृत झाल्याने अशी तडजोड करता येते का, असा पेच निर्माण झाला.
फौजदारी दंड संहिता कलम ३२० (४ब ) प्रमाणे मयताचे वारस मयताच्यावतीने असा तडजोड अर्ज न्यायालयात दाखल करू शकतात ही बाब अर्जदारांचे वकील अॅड.धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
ही मान्य करून न्यायालयाने सदरचा तडजोड अर्ज मंजूर करून विनायक पवार व त्यांच्या कुटुंबीयांची शिक्षा रद्द केली.
या खटल्यात आरोपींतर्फे अॅड.धनंजय माने यांच्यासह अॅड . जयदीप माने , अॅड . सिध्देश्वर खंडागळे , अँड . विकास मोटे तर फिर्यादीतर्फे अॅड . एम.एस. मिसाळ व अॅड . सुहास कदम यांनी काम पाहिले.
मृत व्यक्तीच्यावतीने तिच्या कुटुंबीयांनी फौजदारी खटल्यात अपिलात तडजोड करण्याची न्यायालयीन वर्तुळातील ही घटना मानली जाते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज