मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा शहरातील कापड दुकाने , तयार कपडे विक्रेते, सराफ ज्वेलर्स या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाली आहे.याबाबत नगरपरिषदेने आपला अहवाल प्रांताधिकारी भोसले यांच्याकडे पाठविला.या कारणामुळे भविष्यात मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. यामुळे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दि.१७ मे पर्यंत सराफ ज्वेलर्स,कपडे व तयार कपडे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
नगरपरिषद हद्दीतील सराफ ज्वेलर्स व कपड्याची सर्व प्रकारची दुकाने भविष्यात सुरू करण्याच्या दृष्टीने व्यापारी असोसिएशनसोबत दि.१७ मेपर्यंत बैठक घेऊन नियमावली तयार करून त्यानंतर या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून मंगळवेढा तालुका समन्वय समितीने सराफ व्यावसायिक व कापड व्यावसायिकांना नियमावलीचे पालन करूनच दुकान उघडे ठेवणे उचित ठरेल, असा निर्णय घेऊन दि.१७ मे पर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
मंगळवेढ्यात ११ व्यावसायिकांवर कारवाई
मंगळवेढा शहरातील व्यावसायिकांना घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी शहरातील ११ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यकसह शहरातील व्यावसायिकांना आठवड्यातील दोन दिवस आपली दुकाने उघडण्याची सवलत मिळाल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
नगरपरिषदेकडून नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाने ज्या व्यावसायिकांनी रजिस्टर ठेवले नाही.सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नाही, तसेच मास्क वापरले जात नाही, असे निदर्शनास आलेल्या दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला.
————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज