टीम मंगळवेढा टाईम्स ।
इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंदापुरात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचं टेन्शन वाढवलं.
इंदापूरच्या जागेसाठी थेट दिल्लीतून बोलणी होते, एवढी इंदापुरची जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. याच जागेच्या संघर्षातून संघर्षातून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला.
आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दाव्यानुसार इंदापूरमध्ये जर पुढील आमदार काँग्रेसचा असेल तर मग राष्ट्रवादीचं काय? अशी चर्चा आता इंदापुरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. साहजिकच पटोले यांनी इंदापुरात येऊन भरणे आणि अजितदादांचं टेन्शन वाढवलं आहे.
नाना पटोले पंढरपूरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असता त्यांनी इंदापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं. पटोलेंच्या वक्तव्याने इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?, भरणे-अजितदादांचं टेन्शन का वाढलं?
पटोले म्हणाले, इंदापूर तालुक्यात कॉंग्रेसला मानणारा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला मानणारे लोक आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. ‘भरणे यांच्यासाठी आघाडीत बिघाडी झाली तरी बेहत्तर पण आपण इंदापूरची जागा काँग्रेसला सोडणार नाही’, अशी भूमिका विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी घेतली होती.
मात्र आता पटोले यांच्या वक्तव्यानंतर या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष अटळ आहे. त्यातही राज्यातली राजकीय परिस्थिती पाहता एका जागेवरुन जर वाद होणार असतील तर निश्चित भरणे-अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे.
इंदापूरची जागा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची का?
इंदापूरची जागा पवार कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. एकतर बारामतीला लागूनच इंदापूर तालुका आहे. त्यातही या तालुक्याचे नेतृत्व ज्यांनी मागील 20-25 वर्ष केले त्या हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबामध्ये सख्य नाहीये.
अशावेळी काहीही करुन हर्षवर्धन पाटील यांना आस्मान दाखवायचं, या प्रयत्नात राष्ट्रवादी असते. मागील विधानसभेत हेच ध्येय ठेऊन काँग्रेस पक्षाकडे ही जागा असताना देखील सध्या या जागेवर राष्ट्रवादीचे भरणे हे स्टँडिंग आमदार आहेत, हे कारण सांगून राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला.
‘मित्रासाठी’ ‘मित्रपक्षाला’ अजित पवार अंगावर घेणार?
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे आता ‘मित्रासाठी’ ‘मित्रपक्षाला’ अजित पवार त्यांच्या स्वभावानुसार अंगावर घेणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
नाना पटोले यांची इंदापुरात येऊन हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका
काँग्रेस पक्षात पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा खाली आहेत. मात्र संधी साधूंसाठी जागा नाही, अशी टीका पटोले यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे, सत्तेसाठी नाही, अशा सर्वांना काँग्रेसची दार उघडे असल्याचंही यावेळी पटोले म्हणाले. 2024 मध्ये काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहणार आहे, अशी भविष्यवाणीही पटोले यांनी केली.(स्त्रोत:tv9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज