मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा धोका, मेट्रो कारशेड आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप यासर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.
खरंतर, राज्यात कोरोनाची लाट अद्यापही कायम आहे. नियम जरी शिथील केले असले तरी जीवघेण्या संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. अशात आता रेल्वे सुरू होण्यावर भर देण्यात येत असल्यामुळे भविष्यात होणारी गर्दी कशी टाळता येईल.
इतकंच नाही तर कोरोनाच्या लसींसदर्भात सरकारचं काम कुठपर्यंत आलं आहे. यावरही मुख्यमंत्री महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मेट्रो कारशेडवरून शह-काटशहाचं राजकारण केलं जात आहे. मेट्रोची कारशेड आरे इथं नेल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्यात आलं आहे. तोच वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता मेट्रो कारशेड कलिना आणि बीकेसीमध्ये हलवावं, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केल्यानं भाजपची धाकधूक वाढली आहे.
त्यामुळे भाजप नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? विरोधकांच्या प्रश्नांची काय उत्तरं देणार हे आज महत्त्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचा पत्राद्वारे संवाद
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने महाविकास आघाडीत अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अशातच शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र त्यावर सारवासारव करण्यास सुरुवात केली. सोनिया गांधींचं लेटर म्हणजे लेटरबाँब नाही, हा संवाद आहे, अशी सारवासारव दोन्ही काँग्रेसने केली आहे.
पण दरम्यान, या संवादातून काय चर्चा झाली आणि यावर उद्धव ठाकरे विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे राजकीय नेत्यांचं लक्ष असणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज