टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील ० ते १८ वर्षांपर्यंतच्या ११ लाख १४ हजार मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यात ५२ प्रकारच्या आजारांची तपासणी होणार आहे. तसेच गरजू मुलांवर उपचारही करण्यात येणार आहेत.
किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
वेळेत रोग निदान व उपचार झाले तर पुढची पिढी सुदृढ राहील, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेमध्ये ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियानाबाबतची बैठक मुख्य कार्यकारी अधिका दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
असे राबविणार अभियान…
मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, समुपदेशन करणे
येथे होणार तपासणी
शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविदयालये, खासगी शाळा, आश्रमशाळा, अंधशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खासगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथाश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे,
१३ ठिकाणी रक्तदान
आरोग्य विभागाकडून गुरुवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी १३ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच जागरूक पालक सुदृढ बालक, आरोग्य शिबिर व आपला दवाखाना असे अभियान राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांनी दिली.
उन्हाळ्यामध्ये रक्ताची कमतरता भासते. म्हणून जिल्ह्याच्या १३ ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम सुरू होणार आहे. यासोबतच आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी अभियान हे सलग ४० दिवस राबविले जाणार आहे. यासाठी ४६४ पथके परिश्रम घेणार आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा मोहीम अधिकारी जावेद शेख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी,
वैद्यकीय अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज