टीम मंगळवेढा टाईम्स । लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने सव्वालाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांच्इया ऐवजासह पोबारा केला. भुरकवडी (ता. खटाव) येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ( The bride fled with two lakhs on the first night of the wedding; Eight arrested in solapur district )
याबाबत विशाल दिनकर जाधव (रा. भुरकवडी, ता. खटाव) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे भुरकवडी येथे आई लक्ष्मी, वडील दिनकर व बंधू तुषार असे एकत्र राहतात. विशाल यांना लग्नासाठी नातेवाईक सचिन गुलाबराव घाडगे (रा. खटाव) यांनी करंडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे एक मुलगी असल्याचे सांगितले.
तिचे छायाचित्रही दाखविले. जाधव यांचे नातेवाइकांना मुलीची हकिकत सांगितली. त्यानुसार वधू पूजा शिवाजी शिंदे (रा. करंडी, जि. पुणे) ही पसंत असल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर सोमवारी (ता. 10) सचिन घाडगे यांच्या ओळखीतील रवींद्र सुदाम जाधव (रा. बसाप्पाचीवाडी, वडूथ), रोशन इन्नूस तांबोळी, इन्नूस अमिर तांबोळी (रा. रामनगर, हडपसर, पुणे), वर्षा रमेश फडतरे (रा. सिद्धार्थनगर, मोहोळ, जि. सोलापूर) हे वधू पूजा तिची बहिणी वैशाली यांच्यासह सायंकाळी सात वाजता भुरकवडी येथे आले.
त्यांनी जाधव यांच्या घर व शेतीची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी (ता. 11) या वधू-वरांचा विवाह घेण्याचे दोन्ही बाजूंकडून निश्चित झाले.
मंगळवारी सकाळी 11 वाजता भुरकवडी येथे जाधव यांच्या राहत्या घरी विशाल व पूजा यांचा हा विवाह करण्यात आला. त्यानंतर वधू पूजा हिच्यासोबत आलेले सचिन घाडगे, रवींद्र जाधव, रोशन तांबोळी, इनूस तांबोळी, वर्षा फडतरे हे निघून गेले, तर वधू पूजा व तिची बहीण वैशाली ताकवले या दोघी राहिल्या होत्या.
रात्री जेवण करून सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर बुधवारी (ता. 12) रात्री सव्वाबारा वाजता वैशाली ताकवले ही घरातून बाहेर येऊन उलटी करीत होत्या. त्या वेळी त्यांनी आपणांस अपचन व पित्त झाले असून, तुम्ही झोपा असे सांगितले. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपण जागे झालो असता पूजा व तिची बहीण वैशाली या दोघी घरात दिसून आल्या नाहीत. त्यामुळे आपण त्यांची शोधाशोध केली असता त्या आढळून आल्या नाहीत, तसेच घरातील साहित्याची पाहणी केली असता रोख रक्कम व सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत.
एक लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम, 60 हजार रुपये किमतीचे आई लक्ष्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, तसेच वधू पूजा हिला लग्नात घातलेले 15 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे मनीमंगळसूत्र असा एकूण दाेन लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले.या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी केला.
याप्रकरणी सचिन घाडगे, रवींद्र जाधव, रोशन तांबोळी, इनूस तांबोळी, वर्षा फडतरे, पूजा शिंदे (रा. रुई कांचन, सोरतापवाडी, ता. हवेली, पुणे), वैशाली ताकवले, अनिकेत मोहन घोलप (रा. बाळे, जि. सोलापूर) या आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज