मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन|
बोरामणी येथे साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 29 हेक्टर भूसंपादन आवश्यक आहे. या भूसंपादनासाठी खरेदीपूर्वी नोटीस बजावण्यात आली असून पुढील आठवड्यात आम्ही या जागेची पाहणी करणार आहोत. शेतकऱ्यांशी चर्चा करून खासगी वाटाघाटींद्वारे भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
विमानतळासाठी घेण्यात आलेल्या जमिनीपैकी 33 हेक्टर वन जमिनीचे निर्वनीकरण आवश्यक असून त्याबाबतचाही प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात आला आहे. बोरामणी येथील विमानतळ जलद गतीने कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
होटगी रोडवरील विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय महापालिका आयुक्तांच्या अखत्यारितील आहे. या चिमणीबाबत आपण आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य केला आहे. याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश समितीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना दिले आहेत. दिलेला आदेश स्पष्ट असून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यामध्ये नव्याने काही सांगण्याची आवश्यकता नसल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज