मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेल्या सहा वर्षात गॅस सिलिंडर दरात सव्वाचारशे रुपयांची वाढ झाली आहे. 2014 साली गॅस सिलिंडरचा दर 468 रुपये होता तो आज 845 रुपये झाला आहे. गॅसवर सबसिडी मिळत असली तरी वर्षाला 12 सिलिंडर कमी पडत असल्याने अनेक ग्राहकांना जादा सिलिंडर घ्यावे लागत असल्याने त्यांना या दरवाढीचा फटका बसत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधनाच्या दरात होणार्या बदलानुसार भारतातील इंधनाचे दर बदलतात. पूर्वी केंद्र सरकारकडून ऑईल कंपन्यांना अनुदान दिले जात होते. पण, कालांतराने सरकारने दरावरील नियंत्रण हटवले. यानंतर इंधनाचे दर ठरवण्याचे अधिकार हे ऑईल कंपन्यांना मिळाले, पण त्याची अंमलबजावणी कधी करायचे यावर केंद्र सरकारने आपले नियंत्रण ठेवले.
चलन विनिमय बदलाचा परिणाम आयात खर्चावर होत असल्यानेही इंधन दर वाढत असतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 2019 च्या जुलै महिन्यात 60 रुपये व ऑगस्ट महिन्यात 102 रुपयांनी कमी झालेले गॅस दर वगळता या दरात सतत वाढ होत आली आहे.
काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ करण्यात आली. 699 रुपयांचा गॅस दर 845 रुपये झाल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले. 2014 साली गॅस सिलिंडरचा दर हा 468 रुपये होता. त्यावर कोणतीही सबसिडी नव्हती. तसेच ग्राहकांनी कधीही सिलिंडरची मागणी करू नये, त्यांच्यावर अप्रत्यक्ष बंधन असावे म्हणून 21 दिवसांनंतर दुसरे सिलिंडर देण्याचा नियम केला. यानंतर केंद्र सरकारने यामधील काळाबाजार रोखण्यासाठी सबसिडी योजना जाहीर केली. ज्याच्या नावे सिलिंडर असणार त्याला घरगुती वापरासाठी 12 सिलिंडरवर सबसिडी देण्यात आली. पण, त्यानंतर घेण्यात येणार्या सिलिंडरवर सबसिडी देण्यात येणार नसल्याचे सांगितले.
पण या सबसिडीमुळे गॅसच्या दरात होणारी अप्रत्यक्ष वाढ ही ग्राहकांच्या ध्यानात येत नाही. आज सबसिडी मिळत असली तरी मूळ दरात वाढ होत असताना सबसिडीचे दरही ही कमी-जास्त झाले आहेत. सध्या 12 सिलिंडरसाठी सबसिडी मिळत असल्याने त्यावरच्या सिलिंडरसाठी ग्राहकांना आहे त्या दराने गॅस खरेदी करावा लागतो. अनेक ग्राहकांना वर्षाला 12 सिलिंडर अपुरे पडतात. त्यामुळे त्यांना विनाअनुदानित सिलिंडर घेणे भागच पडते. अशा काळात ग्राहकांना या सबसिडीचा कोणताही लाभ मिळत नसल्याने आहे त्या दराने सिलिंडर घ्यावे लागते. कमर्शिअल सिलिंडरचे दरही 227 रुपयांनी वाढल्याने याचा दर 1440 रुपये झाला आहे. दर दरवाढीचा अप्रत्यक्ष परिणाम महागाई वाढीवर झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज