मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । टेलिकॉम कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स, स्वस्त कॉल आणि इंटरनेट सुविधा आणि फ्री कॉलिंगची सुविधा लवकरच बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. TRAI याबाबत सध्या विचार करत असून कॉल आणि डेटासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. याआधी टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल रिचार्जचे दर महागणार असल्याची माहिती होती. मात्र त्यापाठोपाठ आता ट्राय फ्री डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगच्या नियमावर विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. त्या पुन्हा एकदा आधीसारखंच डेटा आणि कॉलिंगसाठी वेगवेगळे पैसे आकारले जाण्याची शक्यता आहे.
ट्रायने घेतलेल्या निर्णयानंतर एअरटेल टेलिकॉम कंपनीचे प्रमुख सुनील मित्तल यांनी दूरसंचार सचिवांसोबत चर्चा करून शुल्क आकारणीबाबत चर्चा केली आहे.
मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP) लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार आहेत. 16 डिसेंबरपासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)घेतला आहे.
दुसरीकडे मोबाइल रिचार्ज महागणार असल्याने आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओने त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांनी 50 टक्के तर जिओने 40 टक्के दरवाढ केली आहे. मात्र, तरीही देशात इंटरनेट स्वस्त असल्याचं माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी ट्विटरवरून सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने मोबाईल इंटरनेटच्या किंमती कमी केल्या आहेत. भारतात मोबाइल इंटरनेट डेटाची किंमत जगात सर्वात कमी आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार भारतीयांना प्रत्येक जीबीसाठी 11.78 रुपये मोजावे लागतात.
एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील असं म्हटलं आहे. तसेच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
सर्वात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या जिओनेही 40 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. नव्या प्लॅनमधून ग्राहकांना 300 टक्के जास्त लाभ देऊ असा दावा जिओने केला आहे. ऑल इन वन प्लस या प्लॅनमध्ये अनलिमिटेल कॉलिंग आणि इंटरनेट दिलं जाईल असंही जिओने म्हटलं आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीने कॉलिंगमध्ये प्रतिमिनीट 6 पैसे दरवाढ केली आहे. यामुळे कंपनीचा 1699 रुपयांचा अनलिमिटेल वार्षिक प्लॅन 2 हजार 399 रुपये इतका होणार आहे. तसेच दररोज 1.5 जीबी डेटासाठी असलेला 199 चा प्लॅन 249 रुपये होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज