मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीबाधित राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यापूर्वीच आर्थिक मदत दिली असून, आता विदर्भात शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आर्थिक मदत सरकारने दिली आहे.
या वर्षी राज्यातील विविध भागात जुलै २०१९ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
दरम्यान, विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख २७ हजार रुपयाची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार म्हणाले, विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही परंतु, त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान ३३ टक्के हानी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार त्या त्या पिकासाठी, क्षेत्रासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख २७ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीस मान्यता देण्यात आली आहे. २६ जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले होते. या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांना मदत देण्यात येणार आहे. कोरडवाहू पिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार एकूण २० हजार ४०० रुपये हेक्टर, आश्वासित सिंचनाखालील पिकांना ४० हजार ५०० रुपये हेक्टरी, तर बहुवार्षिक पिकांना ५४ हजार रुपये हेक्टरी अशी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज