मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 2893 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून 8 हजार 24 थकबाकीदारांनी 3 कोटी 35 लाख रुपयांचे वीज बिल भरले आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणार्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.गेल्या महिन्याभरात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज विभागात थकबाकीदार असलेल्या वाणिज्यिक व औद्योगिक 1112 ग्राहकांनी 36 लाख 5 हजार रुपयांचा भरणा केला.
पंढरपूर विभागात 1331 थकबाकीदारांनी 47 लाख 9 हजार रुपयांचा भरणा केला, तर 22 लाख रुपयांच्या थकबाकीदार 414 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोलापूर शहर व ग्रामीण या दोन विभागांत 3029 थकबाकीदारांनी 1 कोटी 40 लाख रुपयांचा भरणा केला, तर 88 लाख 13 हजारांची थकबाकी असलेल्या 1325 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधिन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. चालू व थकीत वीज बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडून मीटर रिडिंगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. यासोबतच वीज बिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीज बिल भरण्याची मुदत आदींच्या माहितीसह वीज बिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश एसएमएसद्वारे ग्राहकांना पाठविला जात आहे. वीज बिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील एसएमएसद्वारे दिली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज