मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता व पक्षनेता निवडण्याची बाब आव्हानाचे ठरत असल्याने विद्यमान विरोधी पक्षनेता बळीरामकाका साठे व पक्षनेतेपदी आनंद तानवडे यांचीच नियुक्ती कायम ठेवण्याचा पर्याय समोर दिसून येत आहे. याप्रकरणी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे काय भूमिका घेतात, याकडे सदस्यांचेही लक्ष लागले आहे.
जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य विषय समित्या सभापतिपदाच्या निवडी नुकत्याच झाल्या आहेत. सभापती निवडीच्यावेळीच जि.प. पक्षनेता व विरोधी पक्षनेता निवडण्याची राजकीय प्रथा जिल्हा परिषदेत होती. मात्र, या निवडीत अत्यंत चुरस निर्माण झाल्याने या निवडी करणे आव्हानाचे व कठीण झाले आहे.
शिवसेनेतून निवडून आलेल्या मात्र अध्यक्षपदाच्या निवडीवेळी बंडखोरी करून समविचारीमध्ये गेलेल्या अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी मंगळवेढा तालुक्यातील आवताडे गटाचे उमेदवार दिलीप चव्हाण यांची नियुक्ती झाली. अर्थ व बांधकाम समिती सभापतिपदी विजयराज डोंगरे यांची फेरनिवड झाली. जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत वरील तीन महत्त्वाची पदे समविचारी घटकाकडे गेली आहेत.
समाजकल्याण, महिला व बालकल्याण व कृषी व पशुसंवर्धन या तीन समित्यांवर राष्ट्रवादी पुरस्कृत ‘महाविकास आघाडी’ चे वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत ‘समविचारी आघाडी’ व ‘महाविकास आघाडी’ची निम्मी निम्मी सत्ता आली आहे.
भाजपने अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका घेत सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपच्या एकाही सदस्याला महत्त्वाचे पद मिळाले नाही. त्यामुळे आनंद तानवडे यांनाच पुन्हा पक्षनेता या पदावर कायम करण्याचा पर्याय समोर येत आहे. अन्य कोणाची निवड झाली तर पुन्हा सत्ताधारी गटात ‘तीन तेरा…’ होण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मोहिते-पाटील यांची जिल्हा परिषदेत सत्ता आली आहे. मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांनी राष्ट्रवादीचा व्हीप मोडल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी या सहा सदस्यांचे पद अपात्र करण्याची याचिका जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे. याप्रकरणी अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. सत्ताधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य सभापती यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, विशेषत: जि.प. सभागृहात प्रशासनाविरुद्ध योग्य भूमिका घेण्यासाठी बळीरामकाका साठे यांचीच निवड योग्य ठरणार आहे. अन्य सदस्याची निवड केली तर पुन्हा डोकेदुखीचा विषय होणार असल्याने साठे यांनाच पुन्हा अडीच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा पर्याय समोर येत आहे. याप्रकरणी जि.प. अध्यक्ष मात्र काय भूमिका घेणार, याकडेही सदस्यांचे लक्ष आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज