मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कलावंताचे माहेरघर म्हणून लौकीक असलेल्या मरवडे फेस्टीव्हलने सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात मरवडे गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केल्याचे गौरवोद्गार पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेशराव येलपले पाटील यांनी काढले.
मरवडे येथील रौप्य महोत्सवी छत्रपती परिवाराच्या वतीने सलग 21 व्या वर्षी मरवडे फेस्टीव्हल सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी समाजाच्या निकोप स्वास्थ्यासाठी कला , लोककला, साहित्य, संगीत या सर्व बाबींची नितांत आवश्यकता असून मनोरंजन व प्रबोधन या दोन्ही पातळीवर मरवडे फेस्टीव्हलने उपक्रमांची रसिकांना मेजवानी दिली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. ताई मासाळ या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर उद्योगपती हणमंतराव दुधाळ, उपसरपंच विजय पवार,माजी सरपंच अशोकभाऊ पवार, मरवडे भूषण भारत घुले,रमेश शिंदे, दौलत माने , राजाराम कालिबाग, सुभाष भुसे, प्रा.संतोष फटे, प्रा. पाटील, हणमंत शिवशरण, छत्रपती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब सुर्यवंशी इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छत्रपती परिवाराची रौप्य महोत्सवी वाटचाल व मरवडे फेस्टीव्हलमध्ये पाच दिवस आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम या अनुषंगाने संयोजक सुरेश पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी छत्रपती परिवाराचे वतीने सुरेशराव येलपले पाटील व हणमंतराव दुधाळ यांचा ऋणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उदघाटन सत्रानंतर लगेचच कोल्हापूर येथील शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहीरी कलापथकाने “शिवशाही ते लोकशाही ” हा कार्यक्रम सादर करुन रसिकांची दाद मिळवली. शिवचरित्राचे पोवाडे सादर करतानाच भूतकाळ व वर्तमानाची सांगड घालत सामाजिक व्यंगावर प्रहार करीत सर्वांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास चौधरी यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कुंभार यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज