मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी व शिलाई मशीन पुरविण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने महिला व बालकल्याण विभागाला आर्थिक वर्ष सरत असताना 30 लाखांच्या निधी तरतुदीला मान्यता दिली आहे. केवळ एक महिन्यात हा निधी खर्च करण्याचे आव्हान या विभागापुढे असणार आहे.
जि.प. महिला व बाकल्याण विभागाला जिल्हा परिषदेच्या मागील अर्थसंकल्पात जि.प. सेसफंडातून 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यात पुन्हा 42 लाखांची वाढ करण्यात आली असून या विभागास मार्चअखेरपर्यंत एकूण 3 कोटी 90 लाखांचा निधी खर्च करावा लागणार आहे.
महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी या विभागाने 5 लाखांची मूळ तरतूद केली होती.यातील तरतूद आता 3 लाखांनी कमी करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पुरस्कार देण्यासाठी 2 लाखांची मूळ तरतूद होती. आता यात आणखीन एक लाखाच्या निधीची वाढ करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शिकणार्या मुलींना सायकल पुरविण्यासाठी 10 लाखांची मूळ तरतूद होती. यात आता आणखीन 10 लाखांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत सायकल खरेदीसाठी 20 लाखांचे अनुदान मुलींना मिळणार आहे. कुपोषित मुला-मुलींकरिता, किशोरवयीन मुलींकरिता व गरोदर माता व स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार पुरविण्यासाठी तब्बल 90 लाखांची मूळ तरतूद होती. मात्र, राज्य शासनाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळाला नसल्याने या योजनेवरील निधी अन्य योजनांकडे वळविण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन पुरविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने मूळ अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नव्हती. मात्र या योजनेसाठी आता 10 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत पात्र असणार्या महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिठाच्या गिरणीसाठी अर्थसंकल्पात निधी तरतूद करण्यात आला नव्हता. मात्र, आता यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याने या निधीतून ग्रामीण भागातील पात्र महिलांना गिरणी खरेदीसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय योजनांची जाहिरात व प्रसिद्धी करण्यासाठी नव्याने 2 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज