मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुपली (ता. पंढरपूर) गावाजवळील उजनी उजव्या कालव्यावरचा धोकादायक पूल रविवारी (ता. 9) रात्री साडेदहा वाजणेच्या सुमारास अचानक कोसळला. स्थानिक रहिवाशी सचिन माळी या तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
अचानक पूल कोसळल्याने सोलापूर, उस्माबाद, सातारा, महाबळेश्वर, लातूर, परभणी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक बंद झाल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. येथील उजनी उजव्या कालव्यावर 1992ला पूल बांधण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून येथील पूल धोकादायक बनला होता. सध्या उजनी कालव्याला पाणी सोडले आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच पुलाची एक भिंत खचली होती.
ही बाब स्थानिक रहिवाशांनी बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आज अखेर हा पूल कोसळला. रात्र असल्याने वाहतूक तुरळक होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर जवळचे रहिवासी सचिन माळी आणि देविदास माळी यांनी धाव घेतली. त्याच वेळी त्यांनी प्रसंगावधान राखून वाहनांना थांबवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस पोचले. या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने पर्यायी वेळापूर- साळमुख मार्गाने वाहतूक सुरू केली आहे.
पूल कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी उपरी व सुपली येथील तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी मदत केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज