टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणूसाठी अखेर भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे जाहीर होताच.
अवघ्या आठवडाभरात महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांचा अर्ज भरण्यासाठी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित असल्याने पंढरपुरात आज राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आ.भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात दि.१७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने मागील तिन्ही निवडणुकीत झालेली मतविभागणी त्यामुळे कै.आ.भारत भालके यांचा झालेला विजय याचा अभ्यास करत मतविभागणी टाळण्यासाठी भाजपकडून इच्छुक असलेले आ.प्रशांत परिचारक यांची समजूत काढत एकास-एक उमेदवार देण्यात यश मिळवले आहे.
समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे समाधान आवताडेंचा अर्ज दाखल करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा विजयसिंह मोहिते-पाटील, महादेव जानकर, गोपीचंद पढळकर यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांची फौज पंढरपुरात दाखल होत आहे.
यावेळी भाजपकडून मेळावा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून आज भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन पुन्हा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री दत्ता भरणे, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, कांग्रेस, स्वाभिमानी सह इतर पक्षातील प्रमुख दिग्गज नेते पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात येत आहेत.
त्यामुळे अर्ज भरल्यानंतर प्रचाराची दिशाही स्पष्ट होणार आहे. यावेळी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने आज राजकीय धुळवड पाहवयास मिळणार आहे. आज पंढरपुरमध्ये येत असलेले मोठे नेते त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असले तरी प्रशासन ही कामाला लागले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज