मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात येत असलेल्या बायो- सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन आज रविवार, ७ मे २०२३ सकाळी ९ वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
पंढरपूर तालुक्याच्या कृषी, सहकार, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीचे प्रणेते कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील आणि कर्मयोगी सुधाकर परिचारक यांच्यासोबत तालुक्याच्या संपन्नतेची पायाभरणी खा. शरद पवार यानी केली.
आता पंढरपूर तालुक्यातील तिसऱ्या पिढीच्या राजकीय पायाभरणीसाठी ते येत आहेत. औदुंबर अण्णा आणि सुधाकरपंत, भारत भालके यांच्या पश्चात येणारे शरद पवार तिसऱ्या पिढीसाठी काय संदेश देतात याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर तालुका आणि शरद पवार यांच्यातील नाते वारकरी आणि विठ्ठल याप्रमाणे अतूट आहे. १९७२ सालापासून पवारांचे पंढरपूर तालुक्याच्या वाटचालीत योगदान आहे.
औदुंबरअण्णा पाटील यांनी उजनी धरण आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीतून पंढरपूर तालुक्यात कृषी, औद्योगिक क्रांतीचा पाया रचला, उजनीची निर्मिती आणि पूर्णत्वासाठी शरद पवार यांचे महत्वाचे योगदान आहे.
विठ्ठल कारखाना हि औदुंबर अण्णांच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्याला पवारांनी दिलेली देणगी असल्याचे मानले जाते.
औदुंबर अण्णा पाटील, सुधाकरपंत परिचारक, यशवंतभाऊ पाटील या पहिल्या पिढीसोबत शेती, सहकार, शिक्षण, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची कामे केलेल्या पवारांनी नंतरच्या काळात अॅड. राजाभाऊ पाटील, दिवंगत आ.भारत भालके, माजी आ. प्रशांत परिचारक यांना चौफेर विकासाच्या कामात मदत केली.
मागील ५० वर्षे दोन पिढ्यांसोबत ऋणानुबंध पवार यानी जपले. सन २०१९ नंतर पंढरपूर तालुक्यात सार्वजनिक कार्यक्रम, जिवाभावाचे सहकारी काळाच्या पडद्याआड गेले. खा. शरद पवार अनेकदा आले तरी ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा प्रचाराचा शेवटचा कार्यक्रम ठरला. त्यानंतर कोरोनात पवारांच्या जिवाभावाचे सुधाकरपंत परिचारक, भारत भालके, राजूबापू पाटील काळाच्या पडद्याआड गेले.
या नेत्यांच्या पश्चात येत असलेल्या पवारांना आज निश्चितच कर्मवीरअण्णा, सुधाकरपंत यशवंत भाऊ आणि भालके यांची आठवण येणार.(स्रोत:दिव्य मराठी)
विठ्ठल कारखान्यावर विशेष पवारांचे लक्ष
पंढरपूर तालुक्यातील चढत्या आणि उतरत्या काळातही पवारांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीतून वाटचाल करीत आहे. अशा अडचणीच्या काळात पुन्हा एकदा पवारांनीच मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याच सहकार्यांतून ६० कोटी रुपयांचा बायो सीएनजी प्रकल्प उभा राहतो आहे.
त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील तिसऱ्या पिढीच्या राजकीय भवितव्याची पायभरणी पवार आज करून जाणार आहेत. एखाद्या तालुक्याच्या सर्वांगीण वाटचालीत एवढा दीर्घकाळ एखाद्या नेत्याचे सक्रिय असणे विलक्षण आणि कल्पनातीत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज