टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात आज शनिवार ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन करता येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना माध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकतात अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सध्या सोलापूरकर हे गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. शहरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विक्री, सजावट, पूजेच्या साहित्यांचे स्टॉल लागले आहेत. सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी मंडप उभारणी, लेझीम व मिरवणुकांच्या तयारीत आहेत.
दरम्यान, मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून ११ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते, त्यांच्याकडे ११ दिवसांचा उत्सव असेल,
तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे असेही दाते यांनी सांगितले.
विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतो, त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहेत. अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक…
काही जणांकडे गणेशोत्सव दीड दिवस, ५, ७ दिवस, तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळी व संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी.
प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी असेही सांगण्यात आले.
गौरी पूजनासाठी येणारे काही महत्त्वाचे दिवस
■ १० सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने ११ सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज