टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील १८८ पैकी १३ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, १७५ ग्रामपंचायतींसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. विजयी मिरवणुका काढता येणार नाहीत, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १८८ गावांतील १ हजार ५४७ लोकांना कलम १०७ अंतर्गत नोटीस बजावून चांगल्या वर्तनाचा बॉण्ड लिहून घेतला आहे.
तसेच ३५ सराईत गुन्हेगारांनाही नोटिशीतून सक्त ताकीद दिली आहे. ४१ दारू विक्रेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, विनापरवाना कोणालाही मिरवणूक किंवा आंदोलन करता येणार नाही.
पाच तथा त्याहून अधिक लोक एकत्रित फिरत असल्यास (अंत्ययात्रा व विवाह वगळून) त्यांच्यावर जमावबंदी आदेशाअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांनी निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील विजयानंतर कोणीही मिरवणूक काढू नये, शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मतदानावेळी राखावी सर्वांनी शांतता
सोलापूर जिल्ह्यातील १७५ गावांमधील ६५२ बूथवर रविवारी मतदान होणार आहे. त्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे. दारू विक्रेत्यांसह सराईत गुन्हेगार व इतरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यादृष्टीने पोलिसांना आदेश दिले आहेत.- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
ग्रामपंचायतींसाठी ‘असा’ बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात पोलिस उपअधीक्षक, १३ पोलिस निरीक्षक, ५४ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, ६४५ पोलिस अंमलदार, एक हजार होमगार्ड, १०० जणांची एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी या निवडणुकीसाठी नेमली आहे.
…तर पोलिस पाटलांवर कारवाई
गावातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी, निरपेक्ष पद्धतीने निवडणूक व्हावी, यासाठी पोलिस पाटलांना सक्त सूचना केल्या आहेत. त्यांनी निवडणुकीवेळी पोलिसांना मदत करणे अपेक्षित आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील कोणत्या गटाची बाजू घेऊन प्रचार किंवा अन्य काही कृत्य केल्यास, त्यांच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिला आहे. (स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज