मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।
मंगळवेढा पंचायत समितीमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा
जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ गाव , स्वच्छ जल या मोहिमेमध्ये गावचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभागी होऊन गावोगाव चळवळ उभारली पाहिजे.गावातील ग्रामस्थांना बदलण्याअगोदर स्वतःमध्ये बदल करा म्हणजे आपल्याकडे पाहून इतरांमध्ये आपोआप बदल होतात असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे यांनी केले.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व मंगळवेढा पंचायत समितीच्या वतीने बचत भवनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या तालुकास्तरीय सुजल व स्वच्छ गाव या कार्यशाळेत विभागीय समन्वयक कचरे हे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना कचरे म्हणाले , जल जीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्यासाठी ५५ लिटर पाणी दरडोई दरदिवशी पूर्तता करण्याबरोबर शाश्वत व सुरक्षित पाणी पुरवठा करणे हे प्रस्तावित आहे.आज प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर करण्याबरोबर गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करुन आपल्या गावात शाश्वत स्वच्छता ठेवावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , अभियांत्रिकी तज्ञ मुकूंद आकुडे , पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ.ए.सी.मुजावर ,मुल्यमापन व सनियंत्रण तज्ञ यशवती धत्तुरे , मनुष्यबळ विकास तज्ञ शंकर बंडगर , संवाद तज्ञ सचिन सोनवणे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , समाजशास्त्रज्ञ महादेव शिंदे ,यांच्यासह सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी ,गावात शाश्वत स्वच्छतेसाठी शौचालयाचा वापर अनिवार्य करा.स्वच्छता सुविधांची देखभाल दुरूस्ती करा.ग्रामस्थांचा स्वच्छतेसाठी लोकसहभाग घ्या असे आवाहन केले.
सदरच्या दोन दिवसाच्या कार्यशाळेत पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ.ए.सी.मुजावर , अभियांत्रिकी तज्ञ मुकूंद आकुडे , मुल्यमापन व सनियंत्रण तज्ञ यशवंती धत्तुरे आदींनी शाश्वत स्वच्छता , सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन , मासिक पाळी स्वच्छता , पाणी गुणवत्ता आदी विषयावर मार्गदर्शन केले.सदरची कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मगळवेढा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण , विस्तार अधिकारी शिवाजी पवार , ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.आर.सी.धर्मराज संखनवरु , सी.आर.सी.दयानंद सरवळे , एकनाथ जगताप यांनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज