टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया सोमवारी सुरु झाली. पहिल्या दिवशी आठशे उमेदवारांना बोलावले होते. परंतु, तब्बल ३४५ उमेदवारांनी पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीला दांडी मारली.५९ उमेदवार अपात्र ठरले. जे उमेदवार आले नाहीत, त्यांना या भरतीत पुन्हा संधी नाहीच.
राज्याच्या गृह मंत्रालयातर्फे राज्यभरात १८ हजारांहून अधिक पोलिस शिपाई व चालकांची पदे भरली जात आहेत. त्यात शहर पोलिस आयुक्तालयातील ७३ चालक व ९८ पोलिस शिपाई पदांचा समावेश आहे.
तसेच ग्रामीण पोलिस दलात २८ चालक व २६ पोलिस शिपाई पदे भरली जात आहेत. पहिल्यांदा उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. त्यातही सुरवातीला चालक व त्यानंतर शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांची मैदानी चाचणी होणार आहे.
दरम्यान, आज शहर पोलिसांनी ९०० तर ग्रामीण पोलिसांनी ४०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. शहर पोलिस आयुक्तालयाची मैदानी चाचणी २० जानेवारीपर्यंत चालणार असून ग्रामीण पोलिसांतर्फे सुरु असलेली मैदानी चाचणी १० जानेवारीला संपणार आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडावी, यासाठी मैदानाच्या चौहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग कॅमेरे लावले आहेत. सोमवारी भरतीच्या ठिकाणी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे स्वत: काही तास मैदानावर ठाण मांडून बसले होते.
गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी नाही
पहिल्या दिवशी शहर पोलिस आयुक्तालयाने ६०० तर ग्रामीण पोलिसांनी २०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते.
मात्र, शहरातील भरतीकडे २७३ तर ग्रामीण पोलिस भरतीकडे ७२ उमेदवारांनी गैरहजेरी लावली. कॉल लेटर देऊन उमेदवारांना ज्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावले, त्याच दिवशी त्यांची हजेरी अनिवार्य आहे.
गैरहजर उमेदवारांना पुन्हा मैदानी चाचणीसाठी संधी मिळणार नाही. मैदानी न दिल्याने त्यांना लेखी चाचणी देखील देता येणार नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहर पोलिस आयुक्तालयात भरतीसाठी पहिल्या दिवशी ६०० पैकी ३२७ उमेदवार उपस्थित राहीले. त्यातील ३७ जण पडताळणीतच अपात्र ठरले. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांत भरतीसाठी दोनशे उमेदवारांना बोलावले होते, त्यातील १२८ उमेदवार उपस्थित होते. त्यातील २२ उमेदवार अपात्र ठरले.
चालकासाठी पहिल्यांदा मैदानी होत असून काही उमेदवारांकडे लर्निंग परवाना होता, तरी त्यांनी अर्ज केले होते. तर काहींची उंची व वय कमी होते. काहीजणांकडे कागदपत्रे अपूर्ण होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज