टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य व अन्य सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. आचारसंहितेपूर्वी कागदपत्रांची पूर्तता करून कार्यारंभ आदेश घेऊन या कामांना सुरवात करावी, अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.
तहसील कार्यालयात विविध विभागांकडील निधीतून मंजूर कामांच्या व सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेण्यात आला. त्यावेळी आमदार आवताडे यांनी या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास मुख्याधिकारी चरण कोल्हे, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, महावितरणचे विजय पाटील, पाणीपुरवठ्याचे राजकुमार पांडव, स्वीय सहायक रावसाहेब फटे आदींसह अनेक खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार आवताडे यांनी नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत मंजूर झालेल्या कामांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ कामे सुरवात करावी, काही ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे देण्यास असमर्थता दाखवली जात आहे, त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा सूचना दिल्या.
पीकविमा कंपनीने तालुक्यातील तीन महसूल मंडलांना अग्रीम देण्यास नकार दिल्याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून घेत, पत्रव्यवहार करण्याची सूचना दिली.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत वाडी- वस्तीवर पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सुधारित आराखडा सादर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले.
‘कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका’
मंजूर झालेली विकासकामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. सध्या मंजूर असलेले अंदाजपत्रक व कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांस १० जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यता घ्यावी.
प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे १५ जानेवारीपर्यंत सुरू करावीत. वेळेत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून नवीन ठेकेदारास काम द्यावे, अशी तंबीही आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज