मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।
मंगळवेढ्यातील वाढते अवैध धंदे, नकुशा मदने हिच्या खून प्रकरणी अद्यापही तपास नाही, परराज्यातील चार वर्षाचे बालक अपहरण करणार्या आरोपीचा शोध नाही, घरफोड्यांची मालिका सुरुच,
अवैध धंद्याची हप्तेवसूली करणार्या पोलीसावर कारवाई करण्यास होणारी टाळाटाळ या व अन्य मागण्यासाठी तसेच या घटनेला पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्यांसाठी
काल दि.1 जून पासून मंगळवेढ्यातील सर्वपक्षीय, राजकीय लोक कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अवैध धंदे बोकाळले असून येथील पोलीस स्टेशनचा पोलीस हवालदार व डी.वाय.एस.पी.कार्यालयाचा एक पोलीस नाईक असे दोघेजण अवैध धंद्याकडून मंथली हप्ते गोळा करीत असल्यामुळे अवैध धंद्याला बळ मिळून कायदा सुुव्यवस्थेचा प्रश्न समाजात निर्माण होत आहे.
पडोळकरवाडी येथील वृध्द महिला नकुशा मदने हिचा दरोडेखोराने खून केल्या घटनेला 14 महिन्याचा कालावधी लोटला, त्याचा अद्यापही तपास न केल्याने आरोपी मोकाट असल्याने वृध्देला न्याय मिळत नाही.
एम.आय.डी.सी. परिसरातील परराज्यातील एका चार वर्षीय मुलाचे सहा महिन्यापुर्वी अपहरण करण्यात आले असून तो परराज्यातील असल्यामुळे तपासात भेदभाव केला जात आहे.
आरोपी अद्यापही न पकडल्यामुळे तो मुलगा जिवंत की मृत पावला याबाबत काहीच समजू शकत नाही.
मुंबई मधील एका मुलीचा दिल्लीत खून होतो त्याचा तपास संबंधीत पोलीसांना लावण्यात तात्काळ यश येते. मात्र मंगळवेढ्याच्या पोलीसांना यश का येत नाही? हा संतापजनक सवाल आहे.
मंगळवेढ्यात भरदिवसा घरफोडीचे प्रमाण वाढत चालले आहे. मंगळवेढ्याच्या इतिहासात आत्तापर्यंत कधीच भर दिवसा सतत घरफोड्या झालेल्या नाहीत.
सध्या पोलीस निरीक्षक असलेल्या यांच्या कारकिर्दीतच भरदिवसा घरफोड्या कशा काय होतात? यामागचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गुपीत शोधून त्याचा पर्दाफाश करावा.
खोटा विनयभंग व खोटी अॅट्रासिटीचे गुन्हे दाखल करुन येथील तक्रारदार जनतेचा आवाज दाबला जात आहे. या घटनेची बाहेरील डी.वाय.एस.पी. दर्जाच्या अधिकार्यांकडून चौकशी करावी.
अवैध धंद्याचे वसूली करणारे पोलीस हवालदार यांच्यावर कारवाई करावी. तत्कालीन पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी मंगळवेढ्यातील तिघांना मुख्यालयात आदेश करुन त्यांच्यावर दोन महिने चांगले संस्कार घडविले होते.
मात्र सातपुते मॅडम गेल्यानंतर डी.वाय.एस.पी. कार्यालयाचे कर्मचारी एक पोलीस नाईक व पोलीस हवालदार हे पुन्हा हप्तेवसूली करीत असल्याने वरिष्ठांनी केलेल्या संस्काराचा काय उपयोग? पालथ्या घड्यावर पाणी अशा शब्दात त्यांच्यावर टिका होत आहे.
दोघे पोलीस एकाच चारचाकी गाडीत बसून मिळून वसूल करीत असल्याचे जनतेच्या निदर्शनास येत असताना वरिष्ठ अधिकारी म्हणतात आम्हीं हप्तेवसूली करीतच नाही, मग ते दोन पोलीस नेमके कोणासाठी ते वसूली करतात असा प्रश्न जनतेला पडला असून
मग त्या दोन पोलीसावर वरिष्ठ कारवाई करणार का पाठराखण करणार? हा तितकाचा महत्वाचा प्रश्न आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामीण भागातील औटपोस्ट ओस पडली आहेत. येथे नेमलेल्या पोलीसांना राहणे बंधनकार असताना सर्व कर्मचारी मंगळवेढ्यात राहून उंटावरुन कारभार हाकत आहेत.
त्यामुळे हुन्नूर,भोसे सारख्या 25 किमी अंतरावरुन तक्रारीसाठी नागरिकांना मंगळवेढ्यात यावे लागत आहे.
वरील सर्व मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिवसेना शिंदेगट शहराध्यक्ष प्रतिक किल्लेदार, शिवसेना समन्वयक नारायण गोवे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, आरपीआय तालुकाध्यक्ष अशोक शिवशरण, प्रहार तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी,
राहुल हेंबाडे, प्रहार कार्याध्यक्ष अमोगसिध्द काकणगी, रासप जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी आदी विविध पक्षाचे लोक बेमुदत धरणे आंदोलनासाठी कारवाई होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज