टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. बारामतीतला पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत पराभवाची कारणं सांगितली.
चार तारखेला देशाची सूत्र कुणाकडे जाणार हे चित्र स्पष्ट झालं. एनडीएला बहुमत मिळालं पण जी अपेक्षा होती तिथपर्यंत ते काही जाऊ शकलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्याबाबत जो काही निकाल लागला त्याबद्दल आम्ही समाधानी नाही. ही जबाबदारी मी मान्य करतो, त्या अपयशाची जबाबदारी मी स्वीकारली आहे, असंही अजित पवारांनी मान्य केलं. आम्ही महत्त्वाचे लोक बसलो होतो, असे निकाल का लागले याबाबत चर्चा झाली.
काही लोक आले काही लोक वैयक्तिक कारणांमुळे आले नाहीत. आमचे विरोधक सांगतायत की काही लोक संपर्कात आहेत, पण सगळे जण आमच्यासोबत आहेत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
‘बारामतीचा जो निकाल लागला त्याबाबत मला आश्चर्य आहे. मला का पाठिंबा दिला नाही, ते मला अजूनही कळालं नाही. पण यशाने हुरळून जायचं नसतं आणि अपयशाने खचून जायचं नसतं. बारामतीमध्ये मी कमी पडलो, हे निर्विवाद सत्य आहे’, असं अजित पवार म्हणाले.
तसंच चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य भोवलं का? असा प्रश्न विचारला असता अजितदादांनी मी आधीच म्हणालो होतो, बारामतीमध्ये येऊन असं बोलणं योग्य नाही, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.
फडणवीसांनी देऊ केलेल्या राजीनाम्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी, एकनाथ शिंदे आणि फडणवीस चर्चा करू. मी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली, आज देवेंद्रजी दिल्लीला गेले, आज सकाळी आम्ही जाऊ, असं अजितदादांनी सांगितलं.
पराभव का झाला?
मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेला. अबकी बार चारसो पारचा जो नारा दिला तो संविधान बदलण्यासाठी असं विरोधकांनी पसरवलं. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात तो फरक दिसून आला.
आम्हाला याचा फटका बसला हे मान्य करावंच लागेल. मुस्लिमांनी सकाळी लाईन लावून मतदान केलं. गमावलेला विश्वास संपादन करावा लागेल, असं अजित पवार म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज