टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांमध्ये 30 हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
10 मार्चनंतर नव्याने सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. साधारणत: अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.
यंदा प्रथमच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. सात-आठ वर्षांनी पदभरती होत असल्याने अनेक उच्चशिक्षित देखील वर्ग-तीन व वर्ग-चार या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीत मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात सेविकांची 236 तर मदतनीसांची 264 पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाड्यांवर 55 सेविकाची भरती केली जाणार आहे.
सध्या जवळपास 90 मदतनीस महिलांना पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरु आहे. 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 मार्चपासून नवीन पदांसाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
प्रत्येक तालुक्याच्या बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार आहेत. 15 दिवसांत संपूर्ण कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून द्यावा लागणार आहे. त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची छाननी करेल आणि त्यानंतर मेरिटनुसार यादी प्रसिध्द होईल.
निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार
शेजारील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पडताळणी करतील. निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ७४० मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्याच्या महिला व बालविकास विभागाला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात आणखी ७४० पदे वाढणार आहेत.
तसेच मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन देखील वाढणार आहे. सध्या मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांना दरमहा पाच हजार ६७५ रुपयांचे मानधन दिले जाते.
तर मोठ्या अंगणवाड्यांमधील सेविकांना आठ हजार ३२५ रुपये आणि मदतनीस असलेल्यांना चार हजार ४२५ रुपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्याचा निर्णय नवीन आर्थिक वर्षात होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. (स्त्रोत: सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज