टीम मंगळवेढा टाईम्स।
चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला संशयित आरोपी भीमा रजा काळे (रा. पारधी वस्ती, कुर्डूवाडी, ता. माढा) याचा मृत्यू पोलिस कस्टडीमधील मारहाणीमुळेच झाल्याचा खुलासा करीत पुणे सीआयडीने
विजापूर नाका पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची हकीकत अशी, कुर्डूवाडी येथील पारधी वस्तीवर राहणारा भीमा याची दुचाकी पोलिसांना विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडली. त्याच ठिकाणी चोरी झाली होती.
त्यानेच ही चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांना त्याला जिल्हा कारागृहातून न्यायालयात हजर केले. अधिक तपासासाठी न्यायालयाने तीन (22 ते 25 सप्टेंबर) दिवसांची पोलिस कोठडी दिली.
त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता संशयित आरोपी भीमा काळे याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी तो लंगडत होता आणि त्याच्या पायाला काळसर रंगाचे वळ होते.
काळे याने गुन्हा कबूल करावा, गुन्ह्यातील मुद्देमाल परत करावा म्हणून त्याला सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, पोलिस कर्मचारी श्रीरंग खांडेकर, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, लक्ष्मण राठोड व अतिश पाटील यांनी मारहाण केली.
त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी तपासी अधिकारी यांना या कारवाईत योग्य ते मार्गदर्शन केले नाही, असेही सीआयडीने फिर्यादीत नमूद केले आहे.
तसेच न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोपीच्या खोलीत व सर्व पक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक होते. मात्र, आरोपीच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले नव्हते, आरोपीस उपचाराची आवश्यकता असताना त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले.
आरोपी हा आजारी असताना व मानसिकदृष्ट्या सक्षम नसतानादेखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भीमा काळे याला 24 सप्टेंबर रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीसह नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. पोलिस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे गेला.
त्यांच्या तपासानंतर आरोपीच्या मरणास कारणीभूत झाल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या भरारी पथकाचे उपअधीक्षक गौतम दिघावकर हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.
Api कोल्हाळ पुन्हा अडचणीत
विजापूर नका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ हे सध्या विजापूर रोडवरील ऑर्केस्ट्रा बारच्या कारवाई दरम्यान तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ केल्याच्या आरोपावरून निलंबित आहेत. त्यांची चौकशी सुरू असून मागील काही महिन्यात त्यांना पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अजूनही रुजू करून घेतलेले नाही. आता या गुन्ह्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
मरण्याच्या 10 दिवसांपूर्वीच होती उपचाराची गरज
विजापूर रोडवरील एका चोरीच्या गुन्ह्यात भीमा रजा काळे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्याला ताप, सर्दी खोकला, उलट्या होत असल्याने पोलिस कोठडी संपण्याच्या शेवटच्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पण, त्यापूर्वी आरोपी काळे हा लंगडत चालत होता. तरीही, तपास अधिकार्यांना योग्य त्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिल्याचे दिसत नसल्याचा ठपका सीआयडीने ठेवला आहे.
तत्पूर्वी, आरोपी काळे याला 22 सप्टेंबर रोजीच उपचाराची गरज होती. तरीही, त्याला चार दिवसांनी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असेही फिर्यादीत नमूद आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज