मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
विज्ञान शिक्षक होण्यासाठी विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये
आणि बारावी विज्ञान शाखेच्या ज्या शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून नेमणूक दिली आहे, त्यांना पुन्हा मूळ पदावर पदस्थापना द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.
त्यामुळे आता त्या शिक्षकांना कोठे नियुक्त्या द्यायचा हा प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या ६५ हजार शाळांवर सव्वादोन लाख शिक्षक आहेत. अजूनही जिल्हा परिषदांच्या शाळांवर ३२ हजारांहून अधिक शिक्षक रिक्त आहेत. वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातच आता समाजशास्त्र आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांचा तिढा निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नवे आदेश काढल्याने विज्ञान विषयाच्या शिक्षकांची पंचाईत झाली आहे. दुसरीकडे आता पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गावरील विद्यार्थ्यांना तो विषय शिकवायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुळात विज्ञान, इंग्रजी अशा विषयांना जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षक खूपच कमी असल्यची वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यात समाजशास्त्राचे २३९ शिक्षक अतिरिक्त
इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गात किमान दोन जरी विद्यार्थी असतील तरी त्याठिकाणी विज्ञान-गणित व भाषेचा प्रत्येकी एक शिक्षक दिला जातो. त्यानंतर पटसंख्या ४५ पेक्षा अधिक झाली आणि पुढे तेथे आठवीचा वर्ग असल्यास तिसरे पद समाजशास्त्राचे मंजूर होते. पटसंख्या ७५ ते १०० पर्यंत असल्यास त्या शाळांमध्ये चौथा शिक्षक विज्ञान विषयाचा मिळतो.
सध्या सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये समाजशास्त्र विषयाचे १६१ पदे मंजूर आहेत, पण कार्यरत तब्बल ४०० शिक्षक आहेत. त्यामुळे सध्या २३९ शिक्षक अतिरिक्त असून त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शेवटी त्या शिक्षकांनी आम्हाला विषय शिक्षक नको, उपशिक्षकपदी नेमणूक देण्याची विनंती केली आहे.
काय आहे शासनाचा आदेश…
विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेऊन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे. प्रत्यक्ष पदवी पूर्ण करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येणार नाही. सहावी ते आठवीच्या वर्गासाठी नवीन आदेशानुसार विज्ञान शिक्षक पदावर पदोन्नती देताना त्यांच्याकडे पदवी असायला हवी. पदवी नसल्यास अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज