मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पत्नी सीमा मगर हिला विहिरीत ढकलून देऊन तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रा. वैभव मगर याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी जन्मठेप व रुपये 10 हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथे राहणारा वैभव कालिदास मगर (वय 35) याचा विवाह सीमा (वय 27) हिच्याबरोबर 2009 मध्ये झाला होता. त्यांना श्रेया नावाची मुलगी आहे. वैभव मगर हा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होता. त्याने पत्नी सीमा हिला सुरुवातीचे चार वर्षे व्यवस्थित नांदविले.
त्यानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता तसेच दारू पिऊन शिवीगाळ करून तुला एक दिवस खल्लास करतो, अशी धमकी देत होता.
याबाबत मृत सीमाचे वडील चंद्रकांत श्रीरंग मोटे, (वय 57, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांनी मोहोळ पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी वैभव मगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पोलिस अधिकारी आर. जी. राठोड यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार विजयकुमार सिरसट ज्याने घटनेपूर्वी आरोपी व मृत सीमा यांना भांडण करताना एकत्रित पाहिले होते त्याची साक्ष व मृताची बहीण प्रियांका मोटे हिची साक्ष तसेच इतर पुरावे, वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकार पक्षाच्या वतीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांचे न्यायनिवाडे या सर्व गोष्टींमुळे आरोपीने त्याची पत्नी सीमा हिचा विहिरीत ढकलून खून केल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयासमोर मांडला.
न्यायालयाने सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी वैभव मगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्याचबरोबर रुपये 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. बी. डी. कट्टे, तर आरोपीच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. मोहोळ पोलिस ठाण्याचे पो. कॉ. एस. एस. धर्मे यांनी कोर्टपैरवी म्हणून मदत केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज