मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ज्या झाडांनी लाखो वारकर्यांना पावसात निवारा दिला आणि उन्हात सावली दिली, अनेक दशके दुष्काळ झेलले, वादळे थोपवली आणि पावसाच्या धाराही अंगावर घेतल्या. अनेक दशके वारकर्यांना निवारा दिला अशा 587 झाडांची कत्तल सुरू झाली आहे. दररोज या मार्गाने ये-जा करणार्या आणि दोन्ही बाजूंनी हजारो वृक्षप्रेमींच्या काळजाला वेदना देत पालखी महामार्ग आकाराला येत आहे.
मोहोळ-पंढरपूर-पुणे-देहू-आळंदी या 965 क्रमांकाच्या महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. महामार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली असून बाधित शेतकर्यांना, मालमत्ताधारकांना मोबादला देण्याचे काम बर्याचअंशी पूर्णत्वास आले आहे.
पंढरपूर-पुणे-देहू-आळंदी हा पूर्वापार पालखी मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. दर दरदिवशी या मार्गाने असंख्य वारकरी आळंदी-देहू-पंढरीची वाट चालत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या परंपरेचे साक्षीदार असलेले जुने महाकाय वृक्ष या मार्गावर वारकर्यांचे निवारे बनून उभे होते. आषाढी, कार्तिकी, चैत्री यात्रेला या मार्गाने हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी येत असतात. त्यांच्या राहुट्या या झाडांच्या सावलीत पडलेल्या आहेत, अनेक दिंड्या परंपरा असल्यासारख्या ठराविक झाडांखाली नित्य नियमाने विसाव्याला थांबत असतात. संतांच्या वाटचालीचे, पंढरीच्या वारीचे साक्षीदार असलेले असे सुमारे 587 विशाल, जुने अनेक दशकांचे वयोमान असलेले वृक्ष गेल्या दोन दिवसांपासून कापून काढले जात आहेत.
मशिनगन घेऊन निष्पाप जमावावर बेछूट गोळीबार करणार्या अतिरेक्यांची प्रतिमा नजरेसमोर उभा राहील, अशा आवेशात मशिन कटरने ठेकेदाराचे कर्मचारी या झाडांची कत्तल करत आहेत. वादळ, वारे, पाऊस समर्थपणे झेललेली महाकाय झाडे या छोट्याशा कटरपुढे हतबल होऊन बघता-बघता जमीनदोस्त होत आहेत आणि काही मिनिटांनंतर त्यांचे अवशेष वाहनांत भरून नेल्यानंतर ती जागा भकास दिसत आहे. परिसरातील शेतकरी, वृक्षप्रेमी झाडांची ही कत्तल असहाय्यपणे पाहणे आणि मनोमन हळहळण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. एरव्ही संतांच्या नामघोषाने, टाळ-मृदंगांच्या निनादात प्रफुल्लीत होणारा पालखी मार्ग आपले अनेक दशकांच्या वाटचालीचे साक्षीदार गमावल्यानंतर सध्या उदास, उजाड, बोडका भासू लागला आहे आणि वाटसरू, वारकरी, बाजूचे शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.
रुंदीकरणास अडथळा नसणारी झाडे तोडू नका : प्रांताधिकारी ढोले
वाखरी हद्दीत प्रस्तावित महामार्गाच्या सीमेबाहेर असलेल्या शासकीय जुन्या झाडांवरही खुणा करून ती कापण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना स्थानिकांनी विरोध केला. त्याचवेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही संबंधितांना फोन करून जी झाडे रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणार नाहीत, ती तोडू नका अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी अशा अनेक झाडांचे जीव वाचल्याचे दिसून येत आहे. परवानगीपूर्वीच झाडे कापण्यास प्रारंभ पालखी महामार्गावरील झाडे तोडण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराने वनविभागाकडे मागितलेली आहे. मात्र, ती मिळण्यापूर्वीच झाडे कापून काढण्यास सुरूवात केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज