मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अल्पवयीन मित्रानेच निखिलला मिरजोळे घवाळीवाडी सड्यावर नेऊन प्रथम गळा दाबून, नंतर अंगावर दगड टाकून ठेचल्याचे तपासात पुढे येत आहे. संशयित अनेक मित्रांची शहर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा प्रत्येकजण दुसर्याचे नाव पुढे करीत होता.
त्यामुळे पोलिसांना काळजीपूर्वक तपास करीत पुरावे गोळा करून खर्या गुन्हेगारापर्यंत जाण्याची कसरत करावी लागत आहे. रविवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मित्राकडून प्रात्यक्षिक करून घेतले. मिरजोळे-पाडावेवाडी येथून निखिल कांबळे याचा मृतदेह शनिवारी सकाळी घवाळीवाडी येथे आढळून आला होता. पोलिसांनी निखिलच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर त्यातीलच एक अल्पवयीन मित्र संशयास्पद वाटला होता
चौकशीदरम्यान त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर निखिलची हत्या केल्याची कबुली त्यातील एका मित्राने दिली. हत्या करणार्या अल्पवयीन मित्राने निखिलकडून एक हजार रुपये घेतले होते. त्यातील 300 रुपये त्याने परत केले होते. परंतु, उर्वरित 700 रुपये देण्यासाठी निखिलने त्याच्याकडे तगादा लावला होता. वारंवार निखिल पैशांसाठी तगादा लावत असल्याने त्याची हत्या करण्याचा कट त्या तरुणाने रचला.
संशयित अल्पवयीन तरुणाने नववीतून शाळा सोडली असून तो घरीच असतो. मित्रांना सोबत घेऊन क्रिकेट खेळणे, चायनिजच्या गाडीवर मौजमजा करणे हाच उद्योग तो करत होता. मौजमजेसाठी त्याने निखिलकडून हजार रुपये घेतल्याचेही कबूल केले आहे. रविवारी पोलिसांनी घेतलेल्या प्रात्यक्षिकात त्याने घटनाक्रम पोलिसांना दाखविला. संबंधित अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हत्या करण्यासाठी त्या तरुणाने अन्य कोणालाही सोबत घेतले नसल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. तर त्या दोघांच्या संपर्कात असलेल्या मित्रांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. शनिवारी सकाळी निखिलची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रात्री नातेवाइकांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. रविवारी सकाळी पालकांसह नातेवाइकांनी अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. त्यानंतर गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केल्यानंतर नातेवाइकांनी निखिलचा मृतदेह ताब्यात घेतला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज