मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातही अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्याने प्रत्येक कुटुंबाचा खर्च वाढला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी केवळ 40 ते 50 हजाराला मिळणारा सालगडी यंदा शेतकर्यांसाठी लाखमोलाचा ठरत असून त्याच्यासाठी सुमारे वार्षिक मजुरी लाखभर रुपये देण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवा सालगडी ठेवण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात सुरु झाली आहे. मोठे क्षेत्र असलेल्या शेतकर्यांकडून सालगडी शोधण्याची मोहिम सध्या सुरू झाली आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखण्यात येतो. सोलापूर जिल्हा हादेखील कृषीप्रधान जिल्हा आहे.जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक कमाविला आहे. बागायतदार शेतकर्यांना शेतात औषधांची फवारणी करणे, ट्रॅक्टरवर मशागतीची कामे करणे, पशुधनाचा सांभाळ करणे यासाठी सालगडी अत्यंत गरजेचा असतो. त्यामुळे या बागायतदार शेतकर्यांकडून दरवर्षी नवा सालगडी कामासाठी ठेवण्यात येतो. बड्या शेतकर्यांबरोबरच बांधावरील शेतकर्यांकडूनही अर्थात बाहेरगावी नोकरीस असणारे पण गावी शेती असणारे चाकरमणी आपल्या शेतात सालगडी ठेवतात. या उतार्यावरील शेतकर्यांची शेती तर पूर्णतः सालगड्यांच्या भरवशावरचं असते. त्यामुळे त्यांना अधिक दाम देऊनच सालगडी शेतीकामासाठी ठेवावा लागत असल्याचे पहायला मिळत आहे.
सन 2000 पर्यंत ग्रामीण भागात सालगडी रास्त दरात शेतकर्यांना उपलब्ध होत होते. मात्र, गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी शेतकर्यांना सालगडी शोधून त्याला वार्षिक मोबदला ठरविणे अत्यंत आव्हानाचे ठरत असल्याने शेतकर्यांसाठी सालगडी ही बाब दुर्मिळ ठरत आहे.
यंदा 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे. गुढीपाडवा म्हणजेच शेतकर्यांसाठी नवे वर्ष असते. या दिवसापासून शेतकरी शेतीच्या नव्या दिवसाची सुरुवात करतो. शासकीय व कंपनी स्तरावर दरवर्षी जसे 1 एप्रिल ते 31 मार्च असा वार्षिक कालावधी असतो. तसाच कालावधी शेतकर्यांसाठी गुढीपाडव्यापासून नव्या वर्षाचा आरंभ करण्यात येतो. यादिवशी शेतकरी शेतीसह पंचक्रोशीतील देव-देवता व घराण्यातील दिवंगत पूर्वजांच्या समाधीचे विधीवत पूजन करतो. यादिवशी शेतकरी कुटुंबासह सालगड्यालाही नवा पोषाख असतो. दुष्काळी परिस्थिती, अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी यासारख्या असंख्य संकटांना सामोरे जात शेतकरी आजही जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. काही शेतकरी तर सालगड्याच्या अख्ख्या कुटुंबालाच वर्षभर आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सालगडी कुटुंबाचे जेमतेम का असेना पण निश्चित मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
उचल घेऊन फरार होण्याचे प्रकार वाढले
ग्रामीण भागात गुढीपाडव्यापासून सालगडी म्हणून शेतकर्यांच्या शेतात राहिलेल्यांना 40 ते 50 टक्के रक्कम सुरुवातीला शेतकर्यांकडून उचल म्हणून देण्यात येते. प्रत्येक गावात सालगडी मिळणे मुश्किल असल्याने काही शेतकरी बाहेरच्या गावातील सालगडी हेरुन त्याची नेमणूक करीत आहेत. मात्र, बाहेर गावचे काही सालगडी उचल रक्कम घेऊन शेतकर्यांच्या हाती कायमची तूरी देऊन फरार होत असल्याच्याही घटना अलीकडच्या काही वर्षांत घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार शेतकर्यांसाठी चांगलाच डोकेदुखीचा बनला आहे.
राहण्याची, भोजनाची होतेय सोय
सालगडी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बहुतेक बागायतदार शेतकरी सालगड्याच्या रोजच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था वर्षभर करतात. काही शेतकरी तर सालगड्याच्या कुटुंबासाठीच शेतात राहण्याची व्यवस्था करतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींना या शेतातच वर्षभर रोजगार मिळतो. त्यामुळे सालगडी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. कुटुंबासाठी आवश्यक असलेला भाजीपाला व धान्यही शेतकर्यांच्या शेतातून मिळत असल्याने कमी खर्चात सालगडी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अलीकडील काळात सालगडी म्हणून काम करणार्यांची संख्याच कमी झाल्याने शेतकर्यांसाठी सालगडी शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
बिहारी सालगड्यांची मोठी चलती
सोलापूर जिल्ह्यात सालगडी मिळणे मुश्किल झाल्याने आणि वार्षिक दरही वाढल्याने बागायतदार शेतकर्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर व माढा तालुक्यातील सुपिक नदीकाठचा बागायतदार शेतकरी चक्क बिहारी सालगडी आणत आहेत. अत्यंत रास्त दरात व अत्यंत कष्ट करणारे मजूर बिहारमधून मिळत असल्याने बहुतेक बागायतदारांच्या शेतात आता बिहारी बाबूंनी जागा घेतली असल्याचे दिसून येत आहे. बिहारी सालगडी कामासाठी दणकट असला तरी तो आपल्या शेतातून कधी जाईल, याची भिती मात्र अनेक शेतकर्यांना लागलेली असते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज