मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अंबाजोगाई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने राज्यभर कनेक्शन असलेल्या बनावट सोन्याचे बिस्किट देऊन फसविणाऱ्या टोळीतील एकास अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीमुळे टोळीतील इतर आरोपींचा छडा लवकरच लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. लक्ष्मण केरबा जाधव (वय २८, रा. सलगरा, ता. जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई रविवारी (दि.८) लातूर येथील गंजगोलाई येथे करण्यात आली.
आरोपी लक्ष्मण जाधव याने अंबाजोगाई येथील एका व्यक्तीस बनावट सोन्याचे बिस्किट देऊन सोन्याच्या दोन अंगठ्या घेत फसविल्याची कबुली दिली आहे.याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांनी दिली. आरोपी जाधव यास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, ७ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथे बसस्थानकाकडून मीनाताई ठाकरे चौकाकडे निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकास बनाव रचून तीन भामट्यांनी त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाई पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून चोरांचा कसून तपास सुरू केला होता.
दरम्यान, अंबाजोगाई शहर पोलिसांना एका खबऱ्याकडून बनावट सोने देऊन नागरिकांना फसविणाऱ्या टोळीतील आरोपींची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विठ्ठल कुंडगीर, मारुती कांबळे, तेजस वाहुळे, गोविंद येलमटे, गोपीनाथ डाके यांनी अंबाजोगाईहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या लातूर येथील गंजगोलाई मध्ये सापळा रचला. सकाळपासून दिवसभर वाट पाहिल्यानंतर हवा असलेला आरोपी लक्ष्मण केरबा जाधव यास दिसताक्षणीच मुसक्या आवळण्यात आल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज