मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ‘महाविकास आघाडी’ सरकारने मराठवाडा व विदर्भातील सावकारी कर्ज काढलेल्या शेतकर्यांचे कर्ज माफ करत 65 कोटी रुपयांचा निधीही वितरित केला. मात्र, नागरी सहकारी बँकांकडून शेतकर्यांनी घेतलेल्या कर्जाबाबत राज्य शासनाकडून अजूनही कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे ‘सावकारीतून सुटले अन् नागरी बँकांत अडकले’, अशी अवस्था नागरी बँकांतून कर्ज काढलेल्या शेतकर्यांची झाली आहे. या बँकांचे कर्ज असलेल्या शेतकर्यांच्या नजरा राज्य शासनाच्या पुढील निर्णयाकडे आहेत.
‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर शेतकर्यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत असलेल्या सोसायटी व राष्ट्रीय बँकांतून पीक कर्ज काढलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्यांना कर्ज वाटप करण्यास हात आखडता घेण्यात आला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही अनेकदा पात्र असतानाही शेतकर्यांना कर्ज वाटप करण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी नागरी सहकारी बँका व पतसंस्था यासारख्या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असणार्या वित्तीय संस्थांकडून कृषी कर्ज घेतले. याकरिता अनेक शेतकर्यांच्या जमिनी बँकेकडे तारण म्हणून गहाण आहेत.
नागरी सहकारी बँका व पतसंस्था यांच्याकडून घेण्यात आलेल्या कर्जावर शेतकर्यांना किमान 15 टक्क्यांपुढे व्याजदर आकारण्यात आला आहे. ज्या शेतकर्यांनी या वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले आहे त्या शेतकर्यांचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीत थकीत पडले आहे. व्याज, चक्रवाढ व्याजामुळे अशा शेतकर्यांच्या कर्जाचा आकडा दुप्पट झाला आहे. त्यामुळे अशा बँकांतून कर्ज काढलेला शेतकरीही अत्यंत बिकट आर्थिक दुष्टचक्रात सापडला आहे. या शेतकर्यांना राज्य शासन दिलासा देणार की त्यांना वार्यावर सोडून देणार, असा प्रश्न शेतकर्यांतून उपस्थित होत आहे.
मराठवाडा व विदर्भातील शेतकर्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच नागरी सहकारी व सहकारी पतसंस्थांतून कृषी कर्ज घेतलेल्या शेतकर्यांची किमान दोन लाखांची तरी कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज