मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा येथील चोखामेळा चौकातील श्री समर्थ दूध डेअरीने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. स्वतःचे धातूचे भांडे किंवा स्टील किटली घेऊन येणाऱ्या ग्राहकाला प्रतिलिटर पाच रुपये सवलत देण्यात येत आहे.
प्लास्टिक वापरून झाल्यानंतर त्याचे संकलन व पुनर्वापर हा उपक्रम पण राबवला जातो. या डेअरीच्या दुकानाच्या फलकावर त्यांनी स्पष्ट लिहिले आहे.प्लास्टिक नको, पर्यावरण संवर्धन हवे. हा फलक आज मंगळवेढ्यात चर्चेचा विषय झाला आहे.

प्लास्टिक ही सुविधा नाही, ती सवय आहे आणि सवय बदलता येते. या दूध डेअरीने ग्राहकांना पर्यावरण जतन याबाबत प्रोत्साहन दिले व धातूची भांडी आणण्यासाठी दरामध्ये सवलत दिली. त्यामुळे ग्राहकालाही फायदा झाला आणि पर्यावरणालाही लाभ नक्कीच होईल.

अशा सारख्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळेल पण लोकांना कालांतराने जुनी सवय लागेल, आणि याचा नक्कीच फायदा पर्यावरण संवर्धनाला होईल. याचे अनुकरण बाकीच्या प्रत्येक दुकानदाराने करावे आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा.

एक प्लास्टिक पिशवी नष्ट किंवा विघटन होण्यासाठी बराच कालावधी लागतो. आपण पाच मिनिटे वापरलेली पिशवी पुढील पिढ्यांना त्रास देते. प्लास्टिकमुळे मातीची सुपीकता नष्ट होते. पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. नाले, गटारे तुंबतात. प्लास्टिक जाळल्यावर विषारी वायू बाहेर पडतात. गाई-म्हशींच्या पोटात प्लास्टिक साचून जनावरे दगावतात.

गरम दूध, चहा प्लास्टिकमध्ये घेतल्याने विषारी रसायने शरीरात जातात. गरम चहा, गरम दूध, कोणतेही खाद्यपदार्थ प्लास्टिक पिशवीत किंवा प्लास्टिकच्या भांड्यात घेतले की प्लास्टिकमधील बिसफेनॉल ए, थॅलेट सारखी रसायने अन्नात मिसळतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो.

जसे की संप्रेरक असंतुलन होते, स्थूलता वाढते, स्त्रियांमध्ये आजार वाढतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, कर्करोग सारखे आजार होतात. प्लास्टिक नष्ट होत नाही, ते लहान लहान तुकड्यांमध्ये तुटत जाते. त्याला सूक्ष्म प्लास्टिक असे म्हणतात. हे सूक्ष्म कण मातीत, पाण्यात, हवेत आणि शेवटी आपल्या अन्नात आणि शरीरात जातात. आणि याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो.

कालांतराने रक्तगटामध्ये सूक्ष्म प्लास्टिक हा घटक पण समाविष्ट होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करणे हे फायदेशीर आहे. म्हणूनच या दूध डेअरीचा हा निर्णय केवळ व्यवसायाचा नाही, तर आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा आहे.
या दूध डेअरीप्रमाणे उपाहारगृह, किराणा दुकान, भाजी बाजार, मिठाई दुकान यांनीही प्लास्टिकला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. यासाठी आपल्या गावातील प्रत्येक उद्योगाने पुढे येण्याची गरज आहे, आणि पर्यावरण संवर्धन करण्याची गरज आहे. किराणा दुकानांनी कापडी पिशवीला प्रोत्साहन द्यावे.
भाजी बाजारात प्रत्येक भाजीसाठी वेगळी पिशवी देणे थांबवावे. लग्न समारंभ यासारख्या कार्यक्रमांमध्ये जेवणाच्या प्लास्टिक, थर्माकोल ताट, पेला, मिरवणुकीमध्ये प्लास्टिक धागे फवारणी यावर कटाक्षाने बंदी आणने गरजेचे आहे. प्रत्येक नागरिक व व्यवसायदारांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करावे. सुका कचरा व प्लास्टिक कचरा वेगळा ठेवावा.
आपल्या आजी-आजोबांच्या काळात प्लास्टिक नव्हते. कापडी पिशवी, पोलादी भांडे, पितळेची किटली हेच पर्याय होते. हेच पर्याय पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहेत. परंपरेकडे परत जाण्याची गरज आहे.
एका दूध डेअरीने सुरुवात केली आहे. आता संपूर्ण मंगळवेढ्याने सुरुवात करावी.
संकल्प करूया – मी स्वतःची कापडी किंवा तागाची पिशवी आणीन, मी स्वतःचे स्टील अथवा धातूचे भांडे आणीन, मी प्लास्टिकला नकार देईन.प्लास्टिक नको, पर्यावरण संवर्धन हवे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










