टीम मंगळवेढा टाईम्स ।
समाज कितीही प्रगत झाला असल्याच्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी मंगळवेढा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
अवघ्या १४ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीररीत्या बालविवाह लावून, तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे या चिमुरडीने सासरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी पती, सासू-सासऱ्यासह स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी स.अ.ढ. हिचे वय अवघे १४ वर्षे २ महिने असताना, ती अल्पवयीन आहे हे माहित असूनही तिचे वडील अर्जुन विठोबा ढगे आणि आई शितल अर्जुन ढगे (रा. निंबोणी)

यांनी तिचा विवाह ज्ञानेश्वर ज्योतीबा कुटे (वय १९, रा. बावची) याच्याशी लावून दिला. हा विवाह २६ नोव्हेंबर २०२५ रोजी लावून देण्यात आला होता.

पाशवी अत्याचार आणि मानसिक छळ
लग्नानंतर नराधम पती ज्ञानेश्वर कुटे याने ती अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

तसेच, सासरा ज्योतीबा मारुती कुटे आणि सासू संगीता ज्योतीबा कुटे यांनी घरकामाच्या कारणावरून तिला सतत तुच्छतेची वागणूक दिली.

पती ज्ञानेश्वर याने तिला वारंवार मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून अखेर ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या बालिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या आरोपींवर झाला गुन्हा दाखल:
मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणी पती ज्ञानेश्वर ज्योतीबा कुटे, सासरा ज्योतीबा मारुती कुटे, सासू संगिता ज्योतीबा कुटे, मुलीचे वडील अर्जुन विठोबा ढगे व मुलीची आई शितल अर्जुन ढगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई आणि कलमे
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवेढा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्याच्या अत्यंत कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

एका निष्पाप बालिकेचा बळी घेणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्वस्तरांतून होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











