मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग ।
वाळू माफियांच्या वकिलावर झालेला जीवघेणा हल्ला, भारत नाना पाटील यांच्यावर भर चौकात ऑइल ओतण्याची घटना आणि आता थेट कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न-या सलग घटनांमुळे टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
डायल 112 वरून मदतीचा कॉल आल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र अशोक शेटे यांच्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथे घडली.

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा, मारहाण व खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमान्वये तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता पोलिस कॉन्स्टेबल शेटे हे डायल 112 ड्युटीवर कार्यरत असताना महादेव तुपसौंदर (रा. अकुंबे, ता. माढा) यांनी दोन इसमांनी मारहाण केल्याची माहिती देत स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे सांगून पोलिस मदतीची मागणी केली होती. त्यानुसार शेटे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

आलेगाव बुद्रुक येथील भिमानगर रोडलगत कॉलर महादेव तुपसौंदर रस्त्यावर मिळून आले असताना, शेटे हे सरकारी गणवेशात त्यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी ग्रे रंगाची विटारा ब्रिझा भरधाव वेगाने तेथे आली.
गाडीतून उतरलेल्या तीन इसमांनी पोलिस गणवेश पाहताच, “तू इथे का आलास?” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. शेटे यांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आलो असल्याचे सांगताच आरोपी अधिकच आक्रमक झाले.

तिघांनी एकत्रितपणे शेटे यांची गच्ची पकडून धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महादेव तुपसौंदर यांनाही ढकलून देण्यात आले. आरोपींनी शेटे यांना खाली पाडून काठीने त्यांच्या उजव्या हातावर मारहाण केली.
यावेळी एकाने दगडाने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवतानाच दगड त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने शेटे यांना चक्कर येऊन ते खाली बसले.

इतक्यावरच न थांबता आरोपींपैकी एकाने, “या पोलिसाला जिवंत सोडायचे नाही,” असे म्हणत पुन्हा दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरकारी गणवेशातील पोलिसावर होत असलेली मारहाण पाहून रस्त्यावरील नागरिकांनी गाड्या थांबवत तत्काळ हस्तक्षेप केला. नागरिकांच्या मदतीने पोलिस कॉन्स्टेबल शेटे यांची सुटका झाली. गर्दी वाढताच आरोपी आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी पोलिस कॉन्स्टेबल शेटे यांच्यावर मार्स हॉस्पिटल, टेंभुर्णी येथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर (दोघे रा. आलेगाव बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) तसेच रामचंद्र तुकाराम चंदनकर यांचा जावई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत असून आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके सक्रिय आहेत.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची प्रतिक्रिया
“कर्तव्य बजावत असताना पोलिसावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल.”
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













