मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
‘जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. 2012 नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, विद्यमान 1 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती.
त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.’ अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
राज्य शासनाने या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या अनुदानाची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून २ लाख इतकी करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत आतापर्यंत अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशांतील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पिक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम शेतीपद्धती यांचा अभ्यास करून आलेले आहेत.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” या निर्णयामुळे आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 2 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल.
त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव घेता येईल तसेच प्रगत देशांतील शेतीपद्धतींचा अभ्यास करून त्या आपल्या शेतीत राबविण्याची प्रेरणा मिळेल.” भरणे पुढे म्हणाले, “ही योजना सन 2004-05 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना विदेशात जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील यशस्वी मॉडेल्स आणि बाजारपेठीय पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल.
योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जांची छाननी जिल्हा कृषी अधिकारी, राज्यस्तरीय समित्या आणि कृषी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केली जाईल.
अभ्यास दौऱ्यांतून शेतकऱ्यांना काय फायदा होईल?
* अत्याधुनिक यांत्रिकी शेती
* ठिबक सिंचन आणि जलव्यवस्थापन
* जैविक शेती
* कृषी उत्पादन प्रक्रिया व मूल्यवर्धन
* कृषी निर्यात आणि विपणन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव मिळणार
* शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत
* अधिक उत्पादन आणि दर्जेदार पिकांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज