मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
प्रसूतीसाठी माहेरी तांदुळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आलेल्या अमृता विजय माने हिला २२ ऑगस्ट २०२२ रोजी पोटात दुखू लागल्याने १०८ रुग्णवाहिकेतून रात्री साडेअकराला बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एलन मलिक तांबोळी व आरोग्य सेविका अर्चना सिद्राम तोडकर या दोघींच्या निष्काळजीपणामुळे अमृताचा मृत्यू झाला.
तीन वर्षांनी दोघींविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पण, दाखल कलमानुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने त्यांना नोटीस बजावली जाणार आहे.
तांदुळवाडी येथील फिर्यादी दत्तात्रय राजेंद्र गाडेकर यांची मुलगी अमृता हिचा विवाह मरवडे (ता. मंगळवेढा) येथील दत्तात्रय माने यांच्यासमवेत झाला होता. अमृता ही प्रसुतीसाठी माहेरी आली होती.
अचानक २२ ऑगस्ट २०२२ रोजी तिच्या पोटात दुखू लागले आणि तिच्या आई-वडिलांनी तातडीने १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यांनी अमृताला बोरामणी आरोग्य केंद्रात दाखल केले, पण तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.
सेविका अर्चना तोडकर यांनी अमृताला डिलिव्हरी वार्डात नेले आणि काहीवेळाने मुलगा झाल्याची वार्ता अमृताच्या आई-वडिलांना दिली. त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला, पण अमृताचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्याची माहिती त्यांनी सेविकेला दिली.
अमृता दुसऱ्या दिवशी चक्कर येऊन पडली व तिचे हातपाय वाकडे झाले होते. बोरामणी रुग्णालयातून अमृताला लगेच सिव्हिल हॉस्पिटलला आणले. त्याठिकाणी उपचारादरम्यान २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास अमृताचा मृत्यू झाला.
बोरामणी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकेच्या हलगर्जीपणामुळे अमृताचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणात सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन हे प्रकरण मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात आले.
त्यांच्या अहवालानंतर डॉ. ऐलन तांबोळी व सेविका अर्चना तोडकर यांच्याविरूद्ध सोलापूर तालुका पोलिसांत तीन वर्षांनी म्हणजेच दि.८ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक घोळवे तपास करीत आहेत.
डॉ.एलन यांनी सोडला जॉब
प्रसुती दरम्यान दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे अमृताचा मृत्यू झाल्याची फिर्याद अमृताच्या वडिलांनी पोलिसांत दिली. पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत, पण डॉ. एलन यांनी नोकरी यापूर्वीच सोडली असून त्या सध्या सोलापुरात नाहीत. गुन्ह्यातील कलमांनुसार सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याने दोन्ही संशयितांना नोटीस बजावून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज