मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोलीस आणि महसूल विभागाकडून अनेकवेळा कारवाई करून देखील वाळू तस्करी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातच जळगावच्या एका तहसीलदाराची आता राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांना रोखण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून कारवाई केली. या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आटोपून धरणगावला परतत होते. प्रवासादरम्यान बांभोरी पुलावरून जात असताना, त्यांना नदीपात्रात काही लोक अवैधरित्या वाळू उपसताना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले आणि थेट नदीकाठी धाव घेतली.
नदीत उडी मारून पाठलाग
नदीपात्रात त्या वेळी पाण्याचा प्रवाह अधिक होता, तरीही तहसीलदार सूर्यवंशी यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट पाण्यात उडी घेतली.
पोहत-पोहत त्यांनी दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या दिशेने येताना पाहताच वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
तहसीलदारांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. जरी माफिया त्या क्षणी पकडले गेले नाहीत, तरी तहसीलदारांच्या या कृत्यामुळे प्रशासनाच्या वचकाची प्रचिती पुन्हा एकदा आली.
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये धडकी
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नागरिकांनी तहसीलदारांच्या धाडसाचं आणि कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं आहे. काहींनी ही कारवाई “फिल्मी स्टाईल” म्हणत त्यांची तुलना एखाद्या सिनेमातील नायकाशी केली आहे.
तर या घटनेनंतर वाळू माफियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जळगाव जिल्ह्यात वाळू उपसाचा मुद्दा अनेकदा ऐरणीवर येत असतो. मात्र, एक प्रशासनिक अधिकारी स्वतः मैदानात उतरून अशा प्रकारे कारवाई करतो, हे दुर्मिळच आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या धाडसी कृतीमुळे जिल्हा प्रशासनाचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज