टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला. या निकालाचं वाचन करताना आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, खरी राष्ट्रवादी कुणाची? मूळ पक्ष कुणाचा? असा प्रश्न कायम असताना दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र मूळ पक्ष कुणाचा हे पक्षाचे संविधान आणि विधिमंडळातील संख्याबळावर ठरवले जाते.
या प्रकरणात आपण दोन स्वतंत्र निकाल देणार, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावर आपण पहिला निकाल देणार आणि त्यानंतर आपण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. तर अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार गटाच्या याचिका फेटाळल्या, अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा निकाल
पक्ष कुणाचा? याबाबतचा निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. त्यांनी याबाबतच्या दाखल सर्व याचिका डिसमिस केल्या. त्यांनी अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला. त्यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळ्या. यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.
विधानसभा अध्यक्षांचं अतिशय महत्त्वाचं निरीक्षण
विधानसभा अध्यक्षांनी यावेळी अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. “नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही”, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
“विविध राज्यातीस अशा प्रकरणातील दाखले पाहता विधीमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली आणि सरकार पडले तर तो पक्षाविरुद्ध कार्यवाही होत नाही. कारण त्या पक्षास पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी असते. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे”, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज