मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
देशभरात मोठ्या उत्साहात काल बकरी ईद साजरी झाली. सोलापुरात बकरी ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईदगाह मैदानावर नमाज पठण केलं. मात्र सोलापुरातील याच ईदगाह मैदानाजवळ पाकिस्तानच्या समर्थनार्थ संदेश असलेले फुगे विक्रीला आल्याने एकच खळबळ उडाली.
परंतु या घटनेच्या वेळेस तिथल्या मुस्लिम बांधवांनी हजरजबाबीपणा दाखवत फुगे विक्रेत्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.
त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा राडा त्याठिकाणी झाला नाही. पण ऐन सणासुदीच्या काळात सोलापूरच्या शांततेत कोण विरजण घालतंय असा सवाल यामुळे उपस्थित करण्यात येत आहे.
सोलापुरातल्या होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह समोर काल सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करुन बाहेर पडले होते. याच वेळी ईदगाहच्या बाहेर पाकिस्तानाच्या समर्थनार्थ फुगे विक्री सुरु असल्याचं या मुस्लिम बांधवांच्या लक्षात आलं.
पंरतु तिथे उपस्थित असलेला जमाव आक्रमक होण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी फुगे विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी देखील तातडीने या प्रकरणाची दखल घेतली.
तसेच यासंदर्भात पोलीस अधिक तपास देखील करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पण त्या फुग्यासंदर्भात कसलीच माहिती नसल्याचं ताब्यात घेतलेल्या फुगे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या फुग्यांवर काय लिहिलं आहे हे देखील समजत नसल्याचं या फुगे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
मात्र या सगळ्यामध्ये पाकिस्तानाच्या समर्थनार्थ संदेश लिहिले हे फुगे सोलापुरात आलेच कसे हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. एकूण 100 फुग्याचं हे पाकीट होतं. परंतु केवळ दोन ते तीन फुग्यांवरच पाकिस्तानाच्या समर्थनार्थ संदेश लिहिण्यात आले होते.
ज्या व्यापाऱ्याकडून हे फुग्यांचे पाकीट विकत घेण्यात आले त्यांने सांगितलं की, हे फुग्याचं पाकीट सील बंद होते, त्यामुळे त्यावर असा संदेश लिहिणारे फुगे कुठुन आले या संदर्भात काही कल्पना नाही. दरम्यान हे फुगे मुंबईत खरेदी करण्यात आले असून चायनिज बनावटीचे हे फुगे असल्याचं यावेळी या व्यापाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे पाकिस्तान ऐवजी हे फुगे भारतात आले का असा सवाल देखील आता उपस्थित करण्यात येत आहे. तर नेमकं ईदच्याच दिवशी ईदगाह मैदानावर हे फुगे विक्रिस कसे आले असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
त्यामुळे सोलापुरातील शांतता भंग करण्याचा करण्यसाठी हे षडयंत्र असून पोलिसांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी एमआयएमकडून करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज