टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून, त्यात 23 नव्या मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती राज्याचे वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
दरम्यान, पालकमंत्री पदाची घोषणा देखील या गणेशोत्सवामध्ये होणार असल्याचे सूतोवाच सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
येत्या काही दिवसांत गणोशोत्सवानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त 18 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे.
अजून यात 23 जणांची भर पडू शकते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. यात एकनाथ शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष यांतील काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभराने मंत्रिमंडळआचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांननी त्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले होते.
अजूनही राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर कोण असेल याची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झाल्यानंतर, एकत्रित पालकमंत्र्यांची घोषणा होईल की काय, अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे.
नवे 23 मंत्री कसे?
राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात 43 जणांचे मंत्रिमंडळ करण्याला मुभा आहे.
यापैकी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री सध्या कार्यरत असून, आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा विस्तार येत्या काही दिवसात लवकरच होऊ शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
अनेक जणांची नाराजी दूर होणार?
एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर सुमारे महिनाभराने राज्याच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला होता. त्यातही अधिवेशनाच्या तोंडावर 18 मंत्र्यांना त्यावेळी शपथ देण्यात आली. त्यात काही महत्त्वाच्या नेत्यांना संधी न मिळाल्याने ते नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
तसेच शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचाही विचार यात करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता ही नाराजी दूर करण्यासाठी लकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, अशी चर्चा आहे.
महिला आमदारांना, चेहऱ्यांना संधी
एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे सरकारवर टीका झाली होती. त्यावेळी पुढच्या विस्तारात महिलांना संधी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते.
त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या महिला नेत्यांना संधी मिळणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.(स्रोत;TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज