टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील आंबेचिचोली येथे दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडला
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी दाखल होत खात्री केली. अखेर या प्रकरणी वधू – वर यांचे नातेवाईक तसेच ५० ते ६० वऱ्हाडी मंडळींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आंबेचिचोली येथील गैबीपीर दर्गासमोर एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील यांच्यासोबत पोलीस पथकाने भेट दिली.
मुलीच्या वयाबाबत तिच्या वडिलांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तिच्या वयाचा दाखला प्राप्त करून खात्री केली. त्यानुसार विवाह झालेल्या मुलीचे वय १७ वर्षे १ महिना ११ दिवस असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी फिर्याद दाखल केली. बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार वधू व वराचे नातेवाईक , लग्न लावणारे काझी , मंडपवाले व लग्नास उपस्थित ५० ते ६० लोकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सतीश चंदनशिवे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज