टीम मंगळवेढा टाईम्स ।
व्याज व मुद्दल देऊनही पुन्हा पैसे द्यावेत; अन्यथा गळा चिरून ठार मारेन, कुटुंबाला जाळून मारेन, अशी ईश्वर रामनाथ मोरे (वय 27, रा. साठे शिंदे वस्ती, डोणगाव रोड) यांना दोघा सावकारांनी धमकी दिली.
याप्रकरणी राजू गायकवाड व समर्थ गायकवाड या दोघांविरुद्ध सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, 20 मे 2018 रोजी मोरे यांना गिरणी विकत घेण्यासाठी 2 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांनी सावकार राजू गायकवाड याच्याकडून 2 लाख रुपये 5 टक्के व्याजाने घेतले होते.
परंतु, व्याज देण्यास उशीर झाल्याने राजू व समर्थ गायकवाड हे व्याजाच्या पैशावरही 5 टक्क्यांप्रमाणे दंड लावत होते. त्यामुळे जेवढी रक्कम परत देईल ती व्याज आणि दंडातच जात होती. त्यामुळे मोरे यांना सावकारांना पैसे परत देणे अडचणीचे ठरू लागले.
अखेर मोरे यांनी 10 जानेवारी 2019 रोजी स्वत:चा गाळा विकून सावकार गायकवाड याला 2 लाख मुद्दल परत दिले होते. परंतु, त्यानंतरही पुन्हा सावकारांनी जानेवारी 2019 या महिन्याचे व्याज 10 हजार रुपये व दंड असे 25 हजार रूपये झाले असे सांगून मोरे यांच्याकडे पैशाची मागणी केली.
मोरे याने तरीही हे 25 हजार मी तुम्हाला थोडे थोडे करून देतो, अशी सावकारांना विनवणी केली. परंतु घरगुती अडचणीमुळे मोरे यांना 25 हजार देता आले नाहीत.
त्यामुळे 8 जून 2021 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास समर्थ गायकवाड हा मोरे यांच्या घरी आला. त्याने मोरे यांना तुला पैसे घेऊन बोलाविले आहे. नाहीतर विळ्याने गळा कापण्यास सांगितले आहे, अशी धमकी दिली. यावेळीही मोरे यांनी दोन-तीन दिवसांत पैशाची सोय करतो, असे सांगितले.
तेव्हा समर्थ गायकवाड याने तुझा हिशोब आता 1 लाख झाला आहे. असे सांगत अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली. दोन दिवसांत पैसे नाही दिले तर तुझ्या घरातील सर्वांना जाळतो, अशी धमकी दिली.
यावर मोरे यांनी गायकवाड याला तुम्हाला मुद्दल दिली आहे. उरलेले व्याज व दंडाचे 25 हजार राहतात, असे स्पष्ट बजावले. तरीही समर्थ गायकवाड हा मोरे यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धाऊन गेला. त्यावेळी मोरे यांचा मेहुणा व मित्रांनी भांडण सोडविले. त्यानंतर समर्थ गायकवाड हा 10 जून रोजी पुन्हा मोरे यांच्या घरात घुसून शिवीगाळ करू लागला.
मोठमोठ्याने आरडाओरड करून मोरे यांच्या अंगावर मारण्यासाठी गेला. तेव्हा मोरे यांच्या आई-वडिलांनी समर्थ याला समजावून सांगितले. पण समर्थ याने मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर सावकारी जाचाला कंटाळून मोरे यांनी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक वाघमारे हे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज