टीम मंगळवेढा टाईम्स ।
दुकान बंद करून दागिन्यांची बॅग घेऊन घरी निघालेल्या सराफाच्या डोळ्यात तिखट टाकून 54 लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आले होते. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या गुन्ह्याचा 48 तासांच्या आत तपास करून चौघा दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.राजा नुरूद्दीनसाब सौदागर (वय 22, रा. बलोरगी पगा, आलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर), गणेश अर्जुन मरगूर (वय 25, रा. गुब्बेवाडी, इंडी, ता. विजापूर), रवी राजकुमार जमगे (वय 25, रा. गादगी, ता. औराद, जि. बीदर) आणि लक्ष्मण श्रीशैल गुब्याड (रा.तडवळ, ता. अक्कलकोट), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अद्यापही तीन दरोडेखोर फरार आहेत.याप्रकरणी डोक्यात मार बसून जखमी झालेले सराफ मल्लिकार्जुन गुंडप्पा पोतदार (वय 37, रा. कोर्सेगाव, ता. अक्कलकोट) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मल्लिकार्जुन गुंडप्पा पोतदार व सचिन सुरेश पोतदार (दोघे रा. कोर्सेगाव, ता. अक्कलकोट) यांचे तडवळ येथे गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 23 मार्च रोजी त्यांनी दिवसभर व्यापार करून सायंकाळी दुकान बंद केले. दुकानातील शिल्लक 1 किलो 200 ग्रॅम सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीचे दागिने, असे एकूण 54 लाख 34 हजार रूपये किंमतीचे दागिने रेक्झिन बॅगमध्ये ठेवले.
दोघेही मोटारसायकलवरून ती बॅग घेऊन तडवळकडून कोर्सेगावाकडे घरी जात होते. ते तडवळजवळीलच रेल्वे गेट येथे आले. त्यावेळी समोरून दोन मोटारसायकलींवर 5 जण आले. त्या 5 जणांनी त्या सराफाची मोटारसायकल अडविली. काही क्षणातच त्यांच्या डोळ्यात लाल तिखट टाकले. लोखंडी रॉडने डोक्यात व हातावर मारून गंभीर जखमी केले.
त्याचवेळी दरोडेखोर सराफाच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सचिन पोतदार यांनी त्यांच्या एका हाताला मार लागलेला असतानाही एका आरोपीस दुसर्या हाताने पकडून ठेवले. त्यावेळी इतरांनी त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसका मारून पळवून नेली.
दरम्यान, सचिन पोतदार यांनी पकडलेल्या एका दरोडेखारास पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. तो त्याच्या भावाबरोबर आलेला असून इतरांची नावे अर्धवट सांगून अधिक माहिती नसल्याचे त्याने सांगितले.
त्यामुळे गुन्ह्याची गुंतागुंत वाढली होती. पोलिसांना या गुन्ह्यात आलमेल (ता. सिंदगी), गुब्बेवाडी (ता. इंडी) तसेच गादगी (ता. औराद) येथील गुन्हेगारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे त्यांच्या पथकाने आलमेल व गुब्बेवाडी येथे जाऊन राजा सौदागर व गणेश मरगूर या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एका आरोपीस तडवळ येथून ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असल्याचीही माहिती मिळाली. या सर्वांनी मिळून तडवळ येथील सराफाला लुटण्याचा प्लॅन आखला. त्याप्रमाणे एकजण 23 रोजी दिवसभर दुकानाची टेहाळणी करीत होता. इतर 5 जण सराफ येण्या-जाण्याच्या रोडवर थांबले होते. सराफ बंधू रेल्वे गेटजवळ आल्यावर त्यांना लुटण्यात आले.
पोलिसांनी आरोपी राजा सौदागर, गणेश मरगूर, रवी जमगे या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 41 लाख 60 हजार 240 रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अक्कलकोटचे उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, हवालदार गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी व चालक समीर शेख यांनी पार पाडली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज