टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माण नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 4 बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडविण्यात आल्या. तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाने धडक कारवाई करीत वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे.
महत्त्वाचे : रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा
शुक्रवारी दुपारी मूढवी गावच्या हद्दीतील माण नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी महसूल प्रशासनाने नष्ट केल्या. यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून माण नदी क्षेत्रात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, नदीपात्राची चाळण केली आहे. दिवस-रात्र बोटींद्वारे वाळू उपसा सुरू आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
महसूल विभागाकडून अनेकदा कारवाई करण्यात येते. मात्र, यामध्ये सातत्य नसल्याने काही दिवसांनी पून्हा वाळू उपसा सुरू येतो. यामुळे प्रशासनाने यापुढे बोटींच्या मालकांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात केल्याशिवाय मुजोर वाळू माफिया वठणीवर येणार नाहीत, अशी भावना नदीकाठचे नागरिक व्यक्त करीत आहेत.
यांत्रिकी बोटींचा पर्यावरणाला धोका
यांत्रिकी बोटींमुळे नदीक्षेत्रातील पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. या ठिकाणी विविध जातींचे पक्षी मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, बोटींच्या मोठ्या आवाजाने आणि पाण्यात डिझेल मिसळन होणाऱ्या प्रदूषणाने त्यांचा अधिवास धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
तसेच वाळू माफियांच्या ट्रक्टर,ट्रकच्या वाहतुकीमुळे परिसरातील गावांमधील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेली वाहने कारखाना महामार्गावरून जात-येत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
कोरोनाच्या संकटापासून महसूल व पोलिस खाते लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात गुंतले आहे. दोन्ही खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ही संधी साधत वाळू तस्करांनी नदीकाठी बेकायदा वाळू उपसा करण्यास सुरवात केली. तरीही पोलिसांना दररोज वाळू उपसा करणारी वाहने मंगळवेढा शहरालगत सापडत होती.
तर काही वाळू माफियांनी पोलिसांना चकवा देऊन वाळू वाहतूक करून मोठी आर्थिक माया जमा केली. त्यामुळे कारवाईला जुमानेसे झाले. त्यामुळे घरकुल व इतर बांधकामांसाठी कमी दरात लागणारी वाळू 12 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीला मिळू लागली शेवटी दोन्ही खात्यांतील प्रमुख अधिकारी या कारवाईत सहभागी होत आज ही कारवाई केली.
तहसीलदार स्वप्नील रावडे व पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान चार होड्यांद्वारे नदीच्या काठावर 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा अंदाजे 50 ब्रास वाळू साठा जप्त करून तहसील कार्यालय , मंगळवेढा येथील प्रांगणात जमा केला.
या कारवाई दरम्यान तहसीलदार स्वप्नील रावडे,पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे, मंडळ अधिकारी उल्हास पोळके,आर.एस. बनसोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे , पोलिस नाईक संतोष चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत पवार, पोलिस नाईक सुहास देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण सावंत , पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा जाधव, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश नलावडे, तलाठी विजय एकतपुरे , एस . एस . लोखंडे ,ए. डी. जिरापुरे , डी . एस . लोंढे , अजित मुलाणी आदी कर्मचारी सहभागी झाले.
यापूढेही कडक कारवाई होणार…
‘शुक्रवारी माण नदी क्षेत्रामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 4 यांत्रिकी बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उध्वस्त केल्या आहेत. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर यापूढेही कडक कारवाई केली जाणार आहे.- स्वप्नील रावडे, तहसीलदार, मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज