टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणात सध्या 120 टीएमसी पाणी असून, त्यात 56.45 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाणी सोडण्याच्या आवर्तनात बदल केला आहे.
रब्बीसाठी एक, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन केले आहे. रब्बीचे आवर्तन 10 ते 15 जानेवारीदरम्यान सोडले जाणार आहे. त्यासंबंधी पुढील आठवड्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.
आज सोमवारी कुकडीसंबंधी कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.जिल्ह्यात रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल यासह तृणधान्याची पेरणी सुमारे साडेतीन लाख हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात उसाचेही क्षेत्र मोठे आहे.
दरम्यान, दरवर्षी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडली जातात, तर उन्हाळ्यात एक आवर्तन सोडले जाते. मात्र, शेतीसाठी पाण्याची खरी गरज उन्हाळ्यात पडते. त्यामुळे दरवर्षीचे नियोजन बदलून रब्बी हंगामात एक, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचा प्रयोग गतवर्षी करण्यात आला.
त्या नियोजनाचे शेतकऱ्यांनी स्वागत केल्याने यंदाही तसाच प्रयोग केला जाणार आहे. डावा, उजवा कालवा, सीना – माढा, दहीगाव, शिरापूर उपसा सिंचन योजना आणि भीमा – सीना बोगद्याद्वारे पाणी सोडले जाणार आहे.
पाटबंधारे विभागाने सर्व नियोजन केले आहे; परंतु कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उजनीतून पाणी सोडले जाणार आहे.
11 टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन
शेतकऱ्यांची गरज पाहून 10 ते 15 जानेवारी या काळात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यासंबंधीचा अंतिम निर्णय होईल. बैठक कधी होणार, यासंबंधी आज (सोमवारी) स्पष्ट होईल.- धीरज साळे,अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर
पाणी सोडण्याचे नियोजन
डावा – उजवा कालवा (कॅनॉल) : 7 टीमएससी
उपसा सिंचन योजना : 3 टीमएससी
भीमा – सीना बोगदा : 1 टीमएसी
सुटणारे एकूण पाणी : 11 टीएमसी(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज