समाधान फुगारे । 7588214814
आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत.
यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने 14 सामने खेळताना 9 विजयांची नोंद केली. त्यांना 5 सामने गमवावे लागले असले तरीही त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान मिळवताना थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सुरुवातीचे काही सामने जिंकत गुणतालिकेत अग्रस्थान मिळालेल्या दिल्लीला नंतरचे सामने गमावल्याने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणेही कठीण बनले होते.
या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार असून यासाठी मंगळवेढा येथील भारत चित्र मंदिर येथील बिग स्क्रीनवर हा महामुकाबला प्रेक्षकांना पाहता येणार असून यामध्ये 140 लोकांना मास्क घालून प्रवेश दिला जाणार असून 100 रुपये तिकिट असल्याची माहिती संचालक दयानंद दत्तू यांनी ‘मंगळवेढा टाईम्स’शी बोलताना दिली.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि दिल्ली आतापर्यंत एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत.या 27 पैकी 15 सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आहे.
तर दिल्लीनेही मुंबईचा 12 वेळा पराभव केला आहे. मुंबईने या मोसमातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव केला. तसेच क्वालिफायर 1 सामन्यातही मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ राहिली आहे.
मुंबईने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अफलातून कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजीला आठव्या क्रमांकापर्यंत खोली आहे. तसेच जसप्रीत बुमराह व ट्रेन्ट बोल्ट यांनी पहिल्या स्पेलमध्येच समोरच्या संघातील बलाढ्य फलंदाजंना तंबूत पाठवले आहे. इतकेच नाही तर त्यांनी डेथ ओव्हर्समध्येही आपली अचूकता सिद्ध करताना सर्व संघांना या पाच षटकांत 8 पेक्षा जास्त सरासरीने धावा करू दिलेल्या नाहीत. त्यातही बोल्टचे स्विंग चेंडू तर बुमराहचे यॉर्कर दिल्लीच्या फलंदाजांसाठी धोका ठरणार आहेत.
दोन्ही संघाचे कर्णधार मुंबईकर
मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे कर्णधार मूळचे मुंबईकर आहेत. यामुळे या अंतिम सामन्यात हे दोन्ही मुंबईकर खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
शिखर धवनला रोखण्याचे आव्हान
‘गब्बर’ शिखर धवनकडे अंतिम सामन्यात साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. गब्बरने या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. धवनने या मोसमात आतापर्यंत एकूण 16 सामन्यात 145.65 च्या स्ट्राईक रेटने आणि 46.38 च्या सरासरीने 603 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर शिखर धवनला रोखण्याचे आव्हान असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या मोसमात धमाकेदार गोलंजाजी करतोय. तसेच रबाडा या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 14 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे पर्पल कॅपही आहे. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांसमोर कगिसोसमोर सावधपणे खेळावे लागणार आहे.
मुंबईची तगडी बॅटिंग लाईनअप
मुंबईकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. यामध्ये क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, कायरन पोलार्ड, पंड्या बंधू यासारखे एकसेएक तगडे फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज आपल्या आक्रमक आणि हार्ड हिटिंगसाठी प्रसिद्ध आहेत. या सर्वफलंदाजांनी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. तसेच या सर्व खेळाडूंमध्ये निर्णायक क्षणी सामना पलटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे दिल्लीसमोर या सर्व फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.
जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट
मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट ही गोलंदाजांची जोडी आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत या मोसमात एकूण 49 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये बुमराहच्या नावावर 27 तर बोल्टच्या नावावर 22 विकेट्सची नोंद आहे. बोल्टने केलेल्या कामगिरीसाठी त्याला या मोसमात 2 वेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीला या गोलंदाजांपासून सावध राहावे लागणार आहे.
मुंबई संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) कायरन पोलार्ड, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.
दिल्ली संघ
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.
नाणेफेक महत्त्वाची ठरणार…
या मैदानावरील खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली आहे. त्यामुळे याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईनेही क्वॉलिफयरच्या पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्धच द्विशतकी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे मुंबईचे पॉवर हिटर्स या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारून दिल्लीवर दडपण राखण्याचा प्रयत्न करेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे नाणेफेकच या सामन्यातही महत्त्वाची ठरणार आहे.
दिल्लीबाबत बोलायचे झाले तर कर्णधार श्रेयस अय्यर, शिखर धवन, मार्कस स्टोनिस व शेमरन हेटमायर या चारच फलंदाजांवर त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. सुमार कामगिरीमुळे पृथ्वी शॉ याला संघातील स्थान गमवावे लागत असून आजच्या सामवन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. गोलंदाजीतही त्यांच्याकडे फारसे पर्याय नाहीत.
कागिसो रबाडा व अनरिच नोर्जे या वेगवान गोलंदाजांनी जरी बळी घेतले असले तरीही त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभावही दिसून आला आहे. फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन यानेही सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरीही त्याला धावा रोखण्यात यश आलेले नाही.
अक्सर पटेल व मार्कस स्टोनिस यांनीही उपयुक्त गोलंदाजी केली आहे. मात्र, त्यांची गोलंदाजीची मदार रबाडा याच्यावरच राहणार आहे. त्यातही मुंबईच्या पहिल्या पाच पॉवर हिटर्सला रोखण्यासाठी त्यांना आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करावा लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज