मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शेत जमिनीसह फ्लॅट खरेदी, अन्य योजनांतर्गत सक्सेस लाईफ आणि सक्सेस डेव्हलपमेंट या कंपन्यांमध्ये मोठ्या रकमांची गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज, मुदतीनंतर मोठ्या कमाईच्या आमिषाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह दहा जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा 7 जणांना अटक करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.व्यवस्थापकीय संचालक शामराव ईश्वरा साळवी (रा. पिशवी, ता.शाहूवाडी), सीएमडी विकास यशवंत लोखंडे (नवे पारगाव, ता. हातकणंगले), रोखपाल रतन बाळासाहेब पाटील (वाळोली, ता. पन्हाळा), संतोष वसंत पाटील (पिशवी, शाहूवाडी), संचालक रमेश दादू पाटील (पिशवी), चंद्रकांत गणपती पाटील (शित्तूर तर्फ मलकापूर, शाहूवाडी, ज्ञानदेव तुकाराम जाधव (पिशवी), बाळू ईश्वरा साळवी (रा. पिशवी), बाबासाहेब पाटील (कोलोली, पन्हाळा), श्रीपती गणपती पाटील (केशवनगर, मुंडवा, पुणे) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. विठ्ठल गणपती दळवी (रा. हुंकार कॉलनी, मणेर मळा, उचगाव, ता. करवीर) यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे तातडीने वर्ग केला आहे. दाभोळकर कॉर्नर येथील अमात्य टॉवर 2 येथील कार्यालयात डिसेंबर 2012 ते 15 फेब्रुवारी 2017 या काळात हा प्रकार घडल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.
दळवी यांनी स्वत:च्या नावे 5 लाख, पत्नी वंदना 5 लाख, आई चिंगूबाई 2 लाख, वडील गणपती 7 लाख अशी 19 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. अन्य 40 ते 50 जणांनी किमान 4 ते 5 कोटी रुपयांची कंपनीकडे गुंतवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
बोंगेवाडी (ता. पन्हाळा) येथील एलआयसी एजंट सर्जेराव पाटील यांच्यामुळे शामराव साळवी यांची ओळख झाली. साळवीने सक्सेस लाईफ, सक्सेस डेव्हलपर्स या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 12 टक्के आकर्षक व्याज आणि मुदतीनंतर घसघशीत नफ्याचे आमिष दाखवून स्वत:सह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक मंडळींना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 2013 मध्ये ताराबाई पार्कातील एका आलिशान हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून सवलतीसह अनेक आमिषे दाखविण्यात आल्यामुळे अनेक उद्योग व्यावसायिकांसह शेतकर्यांनीही मोठ्या रकमांची गुंतवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुदतीनंतर गुंतवणूकीची रक्कम परत मिळण्यासाठी संशयित, कंपनीच्या अधिकार्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही संबंधितांनी टाळाटाळ केल्याने दळवी व अन्य गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडे धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद दाखल केल्याचेही सांगण्यात आले. रात्री उशिरा रतन पाटील, संतोष पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, ज्ञानदेव जाधव, बाळू साळवी, बाबासाहेब पाटील यांनी अटक करण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज